मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरात २७० बाटल्यांचे संकलन
धुळे शहर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी (ता. २०) शहरातील मिल परिसरातील महापालिकेच्या शाळा क्रमांक २८ मध्ये महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र आरोग्य हमी सोसायटी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष, एबी फाउंडेशनतर्फे आरोग्य तपासणी शिबिरासह रक्तदान शिबिर झाले. शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांनी आरोग्य तपासणी करत रुग्णांवर औषधोपचार केले. यात ३८१५ महिला-पुरुषांची आरोग्य तपासणी करून त्यांना संदर्भीय सेवेसाठी सूचित करण्यात आले. तसेच रक्तदान शिबिरात युवकांसह धुळेकर नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविल्याने २७० बाटल्या रक्तसंकलन झाले.

माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, आमदार अनुप अग्रवाल, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, प्रदेश सरचिटणीस डॉ. सुशील महाजन यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने शिबिराचे उद्घाटन झाले. व्यासपीठावर आमदार अग्रवाल, डॉ. भामरे, श्री. अंपळकर, भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा जयश्री अहिरराव, प्रदेश सरचिटणीस डॉ. सुशील महाजन, माजी महापौर चंद्रकांत सोनार, महादेव परदेशी, मायादेवी परदेशी, विश्व हिंदू परिषदेचे उमेश चौधरी, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर, माजी नगरसेविका माधवी नेमाने, नागसेन बोरसे, बंटी मासुळे, प्रवीण अग्रवाल, निलेश नेमाने यांच्यासह भाजपचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

आमदार अग्रवाल म्हणाले, की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त एबी फाउंडेशन व नेमाने परिवाराच्या पुढाकाराने हे शिबिर होत आहे. मिल परिसर हा कष्टकरी, कामगारांना परिसर आहे. यापूर्वी येथे झालेल्या कार्यक्रमात शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले होते. सध्या बांधकाम कामगारांना भांडीवाटपाचा कार्यक्रम सुरू आहे. एबी फाउंडेशनतर्फे आम्ही आठ महिन्यांपासून सतत आरोग्य शिबिरासह गरजूंना वैद्यकीय सेवा, मदत मिळवून देण्याचे व्रत जोपासत आहोत. पैशांअभावी जे गरजू, गोरगरीब रुग्ण गंभीर अथवा अन्य कुठल्याही आजारावर उपचार घेऊ शकत नाही तो इलाजापासून वंचित राहणार याची काळजी घेत प्रत्येक गरजू रुग्णापर्यंत पोहोचून त्यांना वैद्यकीय उपचार व मदत मिळवून देण्याचे काम केले जात आहे. यामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत मिळवून देण्यासह विविध वैद्यकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात येत आहे. यात फाउंडेशनने कुठलीही जात-पात, धर्म न पाहता सेवाकार्य सुरू ठेवले आहे. त्या अनुषंगाने आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान शिबिर होत आहे. यात नागरिकांनी मोठ्या संख्यने सहभागी होऊन शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहनही आमदार अग्रवाल यांनी केले.

माजी नगरसेविका माधवी नेमाने, निलेश नेमाने यांच्या पुढाकाराने झालेल्या या शिबिरात ३८१५ रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर आवश्यक उपचार, औषधे व संदर्भीय सल्ला देण्यात आला. विशेषतः मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, नेत्र तपासणी, स्रीरोगाशी संबंधित तपासण्या, दंततपासणी, पोटाचे विकार आदी आजारांची बाधा असलेल्या रुग्णांच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यांच्यावर उपचार करून औषधांचे मोफत वितरण करण्यात आले. यानिमित्त झालेल्या रक्तदान शिबिरात शहरातील विविध भागांतील युवकांसह नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत रक्तदान केले. यातून तब्बल २७० बाटल्या रक्तसंकलन करण्यात आले. शिबिरासाठी शहरासह जिल्ह्यातील विविध रुग्णालयांतील तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका व आरोग्य सेवकांचे सहकार्य लाभले.