सुरतच्या दोघा व्यावसायीकांना
बिजासन घाटात अडवून लुटले
धुळे,ग्वाल्हेरहून परत येत असतंाना सुरतमधील बांधकाम व्यावसायिकाच्या दोन चालकांना बिजासन घाटात ८ ते १० दरोडेखोरांनी अडविले व मारहाण करत चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील १८ लाखांची रोकड हिसकावून नेली.२५ मे रोजी घडलेल्या या दरोड्याचा तब्बल १२ दिवसांनी म्हणजे शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
यासंदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार जितेंद्रकुमार पटेल (वय ४३) रा. सुरत या बांधकाम व्यावसायिकास कार खरेदी करावयाची असल्याने,त्यांनी त्यांचे चालक राजेंद्रकुमार पटेल आणि महेशभाई पटेल यांना १८ लाख रुपये देऊन ग्वाल्हेरला पाठवले होते. २३ मे रोजी हे दोन्ही चालक त्यांच्या मित्र संदीप पंड्या यांच्या एमएच १४ जेयू ३१९५ या क्रमांकाच्या कारने ग्वाल्हेरला जाण्यासाठी निघाले.२४ मे रोजी ते ग्वाल्हेरला पोहोचले, परंतु त्यांना तेथील कार पसंत पडली नाही.यामुळे २५ मे रोजी सकाळी ते परतीच्या प्रवासाला सुरतकडे निघाले.
बिजासन घाट उतरत असताना सायंकाळी दोन गाड्या आडव्या लावून त्यांची कार अडवली.अचानक थांबलेल्या या गाड्यांमधून ८ ते १० दरोडेखोर बाहेर आले आणि त्यांनी रॉडने चालकांच्या कारच्या काचा फोडल्या व राजेंद्रकुमार व महेशभाई यांना गाडीबाहेर काढून बेदम मारहाण केली.
दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून गाडीतील १८ लाख रुपयांची रोकड असलेली बॅग आणि २० हजार रुपयांचे दोन मोबाइल हँडसेट असा ऐवज हिसकावून घेतले.यानंतर दरोडेखोरांनी राजेंद्रकुमार आणि महेशभाई यांना वेगवेगळ्या गाड्यांमध्ये बसवून काही अंतरावर नेऊन सोडले आणि पसार झाले अशी माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.चालक राजेंद्रकुमार आणि महेशभाई हे चार जून रोजी सुरतला परतल्यानंतर त्यांनी जितेंद्रकुमार पटेल यांना आपबिती सांगितली. ६ जून रोजी जितेंद्रकुमार पटेल यांच्यासोबत चालक घटनास्थळ दाखवण्यासाठी बिजासन घाटात आले. त्यानंतर सांगवी पोलिसांत या दरोड्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
===