धुळे जिल्हा
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले लळींग बंगला येथे होणाऱ्या भीमयात्रा सोहळ्या निमित्त मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग (क्र.३) वरील वाहतूक ३१ जुलै रोजी वळविण्याचे आदेश जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी निर्गमित केले आहेत.
यासंदर्भात दिलेल्या पत्रकात म्हटले आहे,की भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले लळींग बंगला परिसरात ३१ जुलै २०२५ रोजी भिमस्मृती दिनानिमित्त भिमस्मृती यात्रा भरते. यामुळे विविध कार्यक्रमांची रेलचेल असते.मेळावा,जाहिर सभा, रक्तदान शिबीर तसेच सांस्कृतिक कार्यक्रम होत असल्याने अशा विविध कार्यक्रमासाठी धुळे जिल्ह्यासह जळगाव, नंदुरबार, नाशिक तसेच गुजराज व मध्यप्रदेश राज्यातून विविध समाजातील जनसमुदाय उपस्थित राहतात.त्यामुळे गर्दीत वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून यादिवशी मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग (क्र.३) वरील वाहतूक वळविण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी निर्गमित केले आहे.
जिल्हाधिकारी श्रीमती विसपुते यांनी आदेशात म्हटले आहे की,भिमस्मृती दिनानिमित्त ३१ जुलै २०२५ या एका दिवसासाठी सकाळी सहा वाजेपासून रात्री आठ वाजेपर्यंत वळविण्यात येणार आहे.धुळे ते मालेगाव दिशेने जाणारी वाहतूक चाळीसगांव चौफुली, गरताड गाव, शिरुड चौफुली, हेंद्रुण, मोघण, आर्वी मार्गे मालेगावकडे आणि मालेगाव ते धुळे दिशेने येणारी (अवजड वाहन) वाहतुक आर्वीमार्गे मोघण,हेंद्रुण,शिरुड चौफुलीमार्गे चाळीसगांव चौफुली धुळे शहराकडे वळविण्यात येणार आहे.या मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात येणार असल्याने आणि वाहतूक वळविण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी.आवश्यक त्या ठिकाणी योग्य बंदोबस्त,बॅरेकेटींग करण्यात यावे. तसेच योग्य त्याठिकाणी वाहतूक चिन्हे लावण्यात यावे.या बदलाची वाहन चालक,वाहतुकदारांनी आणि नागरिकांनी नोंद घ्यावी असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.