माथेरानच्या शार्लोट तलावात कोपरखैरणे येथील तीन तरुण बुडाले

नवी मुंबई

रायगड जिल्ह्यातील माथेरान येथील शार्लोट तलावात आज तीन तरुण बुडाले.

नवी मुंबईतील कोपरखैरणे येथून दहा जणांचा समूह माथेरानमध्ये पर्यटनासाठी आला होता. यातील काही शार्लोट लेक तलावात पोहण्यासाठी उतरले. यातील तीन जण पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले. सुमित चव्हाण (वय १६), आर्यन खोब्रागडे (वय १९) आणि फिरोज शेख ( वय १९) अशी बेपत्ता असलेल्या तरुणांची नावे आहेत.

घटनेची माहिती मिळताच माथेरान पोलीस, नगरपालिका प्रशासनाचे कर्मचारी आणि स्थानिक बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी या तिघांचा शोध सुरू केला. मात्र रात्री उशिरापर्यंत तिघांचा शोध लागला नव्हता. माथेरान शहराला पाणीपुरवठ्यासाठी या तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे शार्लोट परिसरात पोहण्यास मनाई आहे. मात्र हे मनाई आदेश धुडकावत अनेक पर्यटक पोहोण्यासाठी तलावात उतरत असतात. स्थानिक परिस्थिती आणि पाण्याचा अंदाज न आल्याने अशा दुर्घटना घडतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *