धुळे जिल्हा
भाजपामध्ये होणारे प्रवेश सोहळे हे आमिष दाखवून किंवा भीती घालून केले जात आहेत. स्वतःच साम्राज्य वाचवण्यासाठी व सत्तेच्या मोहापायी जे आज भाजपात गेले, ज्यांना आम्ही नेतृत्व सोपविले होते, ते आता भाजपाची हुजरेगिरी करतील, अश्याचा पराभव कॉग्रेसचा सामन्य निष्ठावंत कार्यकर्त करेल, अशी सडकून टीका माजी आमदार कुणाल पाटील यांचे नाव न घेता काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंतांनी केली. शहरातील काँग्रेस भवनात शहर आणि जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी कार्यकर्त्यांची आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.
बैठकीस खासदार डॉ. शोभा बच्छाव, दिनेश बच्छाव, माजी खासदार बापू चौरे, रमेश श्रीखंडे, पितांबर महाले, भा. ई नगराळे, साबीर शेख, आलोक रघुवंशी, मुज़फ्फर हुसेन, डॉ. दरबारसिंह गिरासे, भानुदास गांगुर्डे, वसंत सूर्यवंशी, महेश घुगे, प्रमोद सिसोदे, पप्पू सहानी, प्रा. जसपाल सिसोदिया, गोपाल अन्सारी, वलवाडीचे छोटू चौधरी, रणजित पावरा, वानुबाई शिरसाठ यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले की, आज या सभागृहात उपस्थित आहेत ते खरोखरच निष्ठावंत आहेत. काँग्रेस पक्ष कधीही कोसळणार नाही. काँग्रेस हा आपल्या विचारांवर ठामपणे उभा आहे. विचारांची लढाई विचारांनी लढली जात आहे. हीच लढाई यापुढेही कायम राहील. महात्मा गांधींच्या देहावसनानंतर त्यांचे विचार आजही कायम आहेत. ज्यांना पक्षाने नेतृत्व सोपविले त्यांनीच पक्ष सोडला. माजी मंत्री रोहिदास पाटील ह्यात असते तर आज कदापिही असे नसते. आमिष दाखवून अथवा कसलीतरी भीती दर्शवून प्रवेश करवून घेतला जात असल्याचा आरोपही सावंत यांनी केला. तसेच शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांची निवड योग्य पध्दतीने होणार असल्याची ग्वाही देखील सावंत यांनी दिली.