सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क
धुळे शहर : Dhule city
धुळे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २ मधील शिवसेना उमेदवार ऋषिकेश मोरे यांच्या घरावर झालेल्या हल्लयानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांच्यासह शिवसेना नेत्यांनी घटनास्थळी एकत्र येत भाजप विरुध्द आगपाखड करुन भाजपच्या उमेदवाराने हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप केला. तसेच धुळे शहरात भाजप दहशत, गुंडगिरी करीत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता, यावर आज शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी प्रतिउत्तर देत उलट शिवसेनेच्याच लोकांनी भाजपच्या महिला उमेदवारावर हात टाकला, बदनामी केली. त्यामुळे त्यांचे आरोप हास्यास्पद असून शिवसेनेच्या नेत्यांना जनताच दाखवेल कोण कोणाला गाडणार, असा पलटवार आ.अनुप अग्रवाल यांनी केला.
आमदार अग्रवाल यांनी आज सकाळी साडेआठला शहरातील महापालिका शाळा क्रमांक २९ मधील मतदान केंद्रावर आपल्या परिवारासह मतदानाचा हक्क बजावला, त्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना ते बोलत होते.
महिला उमेदवाराच्या बदनामीचा प्रकार दुर्दैवी
आमदार अग्रवाल म्हणाले, की जनता शहराचा विकास करणार्या भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी आहे. भाजपसाठी चांगले वातावरण असून, पक्षाचे ५५ उमेदवार विजयी होतील, आणि उद्या निकालानंतर भाजपकडेच सत्ता येईल, असा ठाम विश्वास आहे. प्रभाग २ मध्ये झालेल्या प्रकाराबाबत पत्रकारांनी प्रश्न केला असता आमदार अग्रवाल म्हणाले, की काही लोकांना वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला. बुधवारी सायंकाळी प्रभाग २ मध्ये जी घटना घडली, ती अतिशय दुर्दैवी आहे. या घटनेची सर्व धुळेकरांनी सत्यता जाणून घेण्याची गरज आहे. विरोधकांकडून भाजपच्या महिला उमेदवाराचा अपमान करणे कितपत योग्य आहे आणि उलट त्यांच्याकडूनच आकांडतांडव केला जात आहे. मात्र, धुळेकर जनतेला याची सर्व जाणीव आहे. विरोधकांकडून महिला उमेदवाराची कशी बदनामी केली जात होती, हेही जनता जाणून आहे. शिवसेनेच्या काही लोकांनी या महिला उमेदवारावर हातही टाकला. मात्र, यातून निवडणुकीच्या प्रक्रियेला, तसेच शहराच्या शांततेला गालबोट लागू नये म्हणून आम्ही काल काही बोललो नाही. विरोधकांमधील आपापसांतील वादातून घडलेला हा प्रकार असून, त्याचे बालंट त्यांनी भारतीय जनता पक्षावर उलटविण्याचा हास्यास्पद प्रकार करत भाजपला गाडण्याची भाषा केली आहे. आज प्रभाग दोनमधील जनताच मतदानातून दाखवून देईल, की कोण कोणाला गाडणार आहे.