धुळे जिल्हा
आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक शुभम भिका देव यास पाच हजाराची लाच घेतांना आज धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार, तक्रारदार यांनी आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित,मुंबई (महाराष्ट्र शासनाचा उपक्रम) यांच्याकडुन वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत रोजगार कामी जेसीबीसाठी कर्ज मिळविण्यासाठी पात्रता प्रमाणपत्र घेतले.यानंतर इंडसइंड बँकेकडुन २४ लाख ९६ हजार रुपये वैयक्तिक कर्ज घेतले आणि जेसीबी खरेदी केले होते.
जेसीबीसाठी घेतलेले वैयक्तिक कर्जाची १८ हप्त्यांत (मुदतीत) परतफेड करुन तक्रारदाराने परतफेड केलेल्या व्याजाची रक्कम परत मिळविण्यासाठी १४ जुलै २०२५ रोजी महामंडळाच्या धुळे येथील कार्यालयात जावुन जिल्हा समन्वयक शुभम भिका देव यांची भेट घेतली.
यावेळी देव यांनी कर्जाचा व्याज परतावा मिळण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे तक्रारदार यांच्याकडुन जमा करुन घेतली आणि व्याज परताव्याचा प्रस्ताव महामंडळाच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयाकडे पाठविण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपयांची मागणी केली.पाच हजार रुपये दिल्याशिवाय आपण तुमचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविणार नाही असा हट्ट शुभम देव यांनी धरला.यानंतर वैतागलेल्या तक्रारदराने धुळे येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागात धाव घेतली आणि कार्यालयात समक्ष हजर होऊन लेखी तक्रार केली.
या तक्रारीची लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी १६ जुलै रोजी पंचासमक्ष पडताळणी केली आणि जिल्हा समन्वयक शुभम भिका देव यांनी तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपयांची लाच मागितल्याची खात्री झाल्यावर शहरातील जुने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावरच शुभम देव यांना स्वतः लाच स्विकारतांना रंगेहात पकडले.शुभम देव यांच्या विरुद्ध धुळे शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम लगेचच हाती घेण्यात आले आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे व अपर पोलीस अधीक्षक माधव रेडडी यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे,पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल, तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, प्रविण मोरे, संतोष पावरा, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, रामदास बारेला, प्रविण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी केली.