धुळ्यात जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते उद्घाटन
धुळे जिल्हा
महिला व बाल विकास विभागांतर्गत काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या बालकांसाठी तसेच संस्थेबाहेरील मुलांसाठी चाचा नेहरू बाल महोत्सवाचे आयोजन धुळे येथे करण्यात आले असून क्रीडा, चित्रकला तसेच विविध स्पर्धांचे उद्घाटन धुळे जिल्हा क्रीडा संकुल येथे आज जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रारंभी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा तसेच ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’प्रतिज्ञेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

या कार्यक्रमास नाशिक विभागीय उपायुक्त (महिला व बाल विकास) चंद्रशेखर पगारे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राजेंद्र भामरे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय फडोळ, जिल्हा क्रीडा अधिकारी मनोहर पाटील, जिल्हा परिविक्षा अधिकारी गिरीष जाधव, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा प्रा. डॉ. उषा साळुंखे, सदस्या ऍड. अनिता भांबेरे, सुरेखा पवार, आदी मान्यवर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते म्हणाल्या की, बालकांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी खेळ, कला व सर्जनशील उपक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत. अशा उपक्रमांमुळे बालकांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो तसेच त्यांचा आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे बाल महोत्सवात सर्व बालकांनी मनमुराद खेळ खेळावेत.

यावेळी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी निरीक्षणगृह आणि बालगृहातील विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांची आपुलकीने चौकशी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार जिल्हा परिविक्षा अधिकारी गिरीष जाधव यांनी मानले, तर सूत्रसंचालन पूनम बेडसे यांनी केले. कार्यक्रमास निरीक्षणगृह, बालगृहातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.