स्वस्तिक चित्र मंदिर मालमत्तेची हेराफेरी: 6 जणांसह सिटी सर्व्हेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

स्वस्तिक चित्र मंदिर मालमत्तेची हेराफेरी:
पुन्हा सिटी सर्व्हेच्याच करामती उघड ..

सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल; तत्कालीन कर्मचारी, अधिकारीही पोलिसांच्या रडारवर

धुळे शहर

धुळे शहरातील स्वतिक चित्रपट गृह असलेल्या मालमत्तेचा विक्री व्यवहार कायदेशीर वादात सापडला असून बनावट कायदपत्र, नकाणे आणि नोंदी करुन परस्पर मालकी हक्क दाखवून ४ कोटींची ही मालमत्ता परस्पर विक्री करीत फसवणुक केल्याप्रकरणी धुळे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात सिटी सर्व्हे विभागाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांवर गंभीर प्रकारचे आरोप करण्यात आल्या असून यानिमित्ताने सिटी सर्व्हे कार्यालयात चालणार्‍या करामती पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

या संदर्भात रेखा योगेश शाह (वय-४६ वर्षे) रा.फ्लॅट नं-१०३, लोहिया नगर, अकोला, जि. अकोला, मुळ रा. आग्रा रोड, धुळे, यांनी दिलेल्या लेखी फिर्याद धुळे शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. त्या नुसार खोटे नकाशे, खोटे प्रतिज्ञापत्र आणि खोट्या अर्जासह मालमत्तेचा बनावट उतारा तयार करण्यात तत्कालीन नगर भुमापन अधिकारी आणि कर्मचार्‍यांची मदत घेवून धुळे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेली स्वतिक चित्रपट गृह असलेली ४ कोटींची मालमत्ता हडप करीत परस्पर विक्री करुन फसवणूक केल्याप्रकरणी धुळे शहर पोलिस ठाण्यात सिटी सर्व्हे विभागातील तत्कालीन अधिकारी, कर्मचार्‍यांसह प्रमुख ६ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी रेखा शहा यांचे पती योगेश नेमीचंद शाह यांचा १७ सप्टेंबर २०२४ रोजी मृत्यू झाला आहे. दरम्यान,प्रदिप शाह याने ३१ मार्च २०२५ रोजी या मालमत्तेची (सि.स.नं.१४६६/१) विक्री केल्याचे समजले. यामुळे या मालमत्तेची विक्री कशी व कोणत्या अधिकाराने केली याबद्दल संबंधित कार्यालयाकडून माहीती घेतली. यासाठी या मालमत्ता कार्डचा ऑनलाईन उताराही काढला. त्यात ३० नोव्हेंबर २०११ च्या नोंदीने प्रदिप हिरालाल शाह, सुरेश हिरालाल शाह, कु.उज्वला हिरालाल शाह व राजेंद्र हिरालाल शाह यांची नावे लागल्याचे दिसून आले. धक्कादायक म्हणजे ऑनलाईन मालमत्ता पत्रकावर सन १९५४ च्या तोंडी वाटण्याची नोंदही हटविण्यात आली असल्याचे दिसले. सिटी सर्वे कार्यालयातील संबंधीतांना हाताशी धरुन चुकीची मोजणी करुन बनावट नकाशा तयार केला. खरेदी खतामध्ये सि.स.नं. १४६६/४ मध्ये असणार्‍या स्वस्तिक चित्रपट गृह व क्षेत्राचे वर्णन व चतुर्सिमा टाकुन सि.स.नं. १४६६/४ हे क्षेत्र हे सि.स.नं. १४६६/१ मधीलच क्षेत्र आहे असे दर्शविले. तसा बनावट नकाशाचा वापर करुन खरेदी खताद्वारे सि.स.नं. १४६६/१ ची विक्री करत असल्याचे दाखविले. असे ही फिर्यादी रेखा योगेश शाह यांनी म्हटले आहे.

दरम्यान, या प्रकरणी प्रदिप हिरालाल शहा, सुरेश हिरालाल शाह, श्रीमती उज्वला हिरालाल शाह व श्रीमती रजनी राजेंद्र शाह, अभिषेश राजेंद्र शाह, मोक्षा राजेंद्र शाह उर्फ मोक्षा विराज शाह यांच्यासह सिटी सर्व्हे विभागातील तत्कालीन अधिकारी, कर्मचारी आदींवर धुळे शहर पोलिसांनी संशयितांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *