मुंबई
धुळे येथील संदेशभूमी ट्रॅव्हलर्स बंगला (सार्वजनिक बांधकाम विभागाचे रेस्ट हाऊस क्रमांक २) या वास्तूस ऐतिहासिक वास्तूंची मान्यता मिळण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.
विधानभवन येथे धुळे येथील संदेशभूमी ट्रॅव्हलर्स बंगला वास्तूस ऐतिहासिक वास्तूंची मान्यता मिळण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस धुळे जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभागी झाल्या.तर मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी आणि धुळे येथील कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
उपाध्यक्ष अण्णा बनसोडे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही वास्तू ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत मोलाची आहे. त्यामुळे तिचा ऐतिहासिक वास्तूत समावेश करण्याचा प्रस्ताव तातडीने सादर करावा.
संबंधित जागेची कागदपत्रे संबंधित यंत्रणेकडून घेवून अद्यावत करून घेवून या विषयावर सामाजिक न्यायमंत्री यांच्या उपस्थितीत पुढील बैठक लवकरच घेण्यात येणार असल्याची माहिती धुळ्याच्या जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी दिली.
धुळेकरांसाठी ही वास्तू अभिमानाची बाब असून, डॉ. आंबेडकरांच्या स्मृतींशी निगडीत हा ठेवा ऐतिहासिक वास्तूच्या रूपाने जतन करणे हे आपले कर्तव्य आहे. पुढील पिढ्यांसाठी हा वारसा जतन करणे गरजेचे असल्याचेही श्री. बनसोडे यांनी सांगितले.