धुळे शहर
धुळे शहरातील शंभर फुटी रोड परिसरात जुन्या वादातून तरुणावर गोळी झाडण्यात आल्याने गंभीर जखमी झाला. शाहरुख बाबा शहा असे जखमी तरुणाचे नाव असून तो शहरातील मोगलाई परिसरातील रहिवासी असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मंगळवार दि. 13 मे रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास धुळे शहरातील चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका दुकानाजवळ तरुणांच्या दोन गटांमध्ये जुन्या वादातून जोरदार भांडण झाले. यावेळी एकाने त्याच्याजवळ असलेल्या देशी बनावटीच्या पिस्तुला मधून थेट गोळीबार केला. त्यात शाहरुख शहा याच्या पायाला गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले असून जखमी करून आला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान घटनेची माहिती कळताच पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार उपासे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली तसेच चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या पथकास त्वरित तपासाचे आदेश दिले. या गोळीबाराच्या घटने रात्री उशिरा पर्यंत चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.