धुळे जिल्हा
वादग्रस्त विधाने आणि वादग्रस्त वर्तवणुकीमुळे सध्या चर्चेत असलेले कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे आज धुळे जिल्हा दौर्यावर आले असता त्यांना विरोध करण्यासाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने काळे झेंडे दाखवत धुळ्यात जोरदार आंदोलन केले. कृषीमंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी केली.
विधानसभेत कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे मोबाईलवर ‘जंगली रमी’ खेळत असल्याचा आरोप करीत विरोधकांनी एक व्हिडीओ व्हायरल केला. त्याचे राज्यात प्रचंड पडसाद उमटले. थेट कृषीमंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. या पार्श्वभुमिवर धुळे दौर्यावर आलेल्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात धुळे शहरातील हॉटेल टॉप लाईन बाहेर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकार्यांनी वेगवेगळी आंदोलने केली.
शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल सोनवणे, महानगर प्रमुख धिरज पाटील आदी शिवसैनिकांनी हॉटेल बाहेर काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली. तसेच बाभळे फाट्याजवळ शिवसेना उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी कृषी मंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
तसेच राष्ट्रवादी कॉंगे्रस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने धुळ्यात ज्या हॉटेलमध्ये कृषीमंत्री कोकाटे थांबले होते त्या हॉटैल बाहेर घोषणाबाजी केली. तसेच काळे झेंडे आणि पत्ते उधळले. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष रणजित भोसले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.