धुळे जिल्हा
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तहसिल कार्यालयात महसूल सप्ताहाच्या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत आज तहसील कार्यालयात कृत्रिम वाळू धोरणावरील विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.
या परिसंवादादरम्यान उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक तसेच तहसीलदार महेंद्र माळी यांनी उपस्थितांना कृत्रिम वाळू धोरणाच्या तरतुदीबाबत माहिती दिली.
नद्यांच्या पर्यावरणीय समतोलासाठी नद्यांमधील वाळू सुरक्षित पद्धतीने वापरणे आवश्यक आहे. राज्यात वाळूची उपलब्धता कमी असल्याने सदर तुटवडा परराज्यातून येणाऱ्या वाळू मधून भागवला जात आहे. तथापि, भविष्यात विकास कामांसाठी निश्चित केलेली उद्दिष्टे पाहता राज्यातील वाळूची मागणी अनेकपटींनी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नैसर्गिक वाळूला कृत्रिम वाळूचा पर्याय म्हणून विकास करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने शासनाने कृत्रिम वाळू धोरण निश्चित केले आहे. या धोरणातील तरतुदी उपस्थितांना सविस्तर विशद करण्यात आल्या. तसेच त्यांचे शंका निरसन देखील यावेळी करण्यात आले. तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी कृत्रिम वाळू धोरणासाठी प्रस्ताव देऊन त्या अनुषंगाने येणाऱ्या शासकीय सवलतींचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
परिसंवाद कार्यक्रमास महसूल सहाय्यक अतुल सूर्यवंशी यांचेसह तालुक्यातील शासकीय व खाजगी ठेकेदार, स्टोन क्रशरधारक तसेच नागरिक उपस्थित होते.