*धुळे जिल्ह्याचा राष्ट्रीय पातळीवर गौरव*
धुळे
विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद २०२५ मध्ये देशातील डिजिटल गव्हर्नन्स क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात धुळे जिल्ह्यातील, रोहिणी ग्रामपंचायतीने संपूर्ण देशात प्रथम क्रंमाक प्राप्त करून सुवर्ण पुरस्कार मिळवून ऐतिहासिक यश संपादन केले.
१९९७ पासून सुरू झालेल्या या मालिकेतील ही २८ वी राष्ट्रीय परिषद ठरली.
यंदाच्या परिषदेमधील वैशिष्ट्य म्हणजे—पहिल्यांदाच ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी (ग्रामपंचायतींसाठी) ई-गव्हर्नन्स क्षेत्रातील कामगिरीवर आधारित स्वतंत्र पुरस्कार सुरू करण्यात आला. आणि अभिमानाची बाब म्हणजे, या नव्या श्रेणीत रोहिणी ग्रामपंचायतीस सुवर्ण पुरस्कारामध्ये १० लाख रुपयांचे रोख पारितोषिक, ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे.
हा पुरस्कार केंद्रीय मंत्री जितेंद्रसिंह, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, उपमुख्यमंत्री पवन कल्याण, भारत सरकारचे डीएआरपीजी सचिव श्रीनिवासन तसेच भारत सरकारचे अनेक मान्यवर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
रोहिणी ग्रामपंचायतीला हा सन्मान सक्षम प्रशासनिक नेतृत्व आणि सामूहिक प्रयत्नांमुळे मिळाला आहे. जिल्हा परिषद धुळेचे मुख्य कार्यकारी अधिकारी. विशाल सविता तेजराव नरवाडे (भा. प्र. से.), ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश मोरे यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक राजकीय नेतृत्व तसेच ग्रामस्थांच्या सहभागातून हा आदर्श घडवून आणला गेला. ग्रामपंचायत रोहिणीचे सरपंच आनंदराव गणपत पावरा, उपसरपंच वसंत बोना पावरा, तसेच ग्राम विकास अधिकारी मनोज कुमावत यांचे सक्रिय योगदान या यशामध्ये मोलाचे ठरले.
दुसऱ्या दिवशीच्या सत्रात, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सविता तेजराव नरवाडे यांनी संपूर्ण देशातील ग्रामपंचायतींना उद्देशून रोहिणी ग्रामपंचायतीच्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनचा अनुभव मांडला.