तुळसाबाई मळा भागातील  रहिवाशी हक्काच्या सिटीसर्व्हे उताऱ्यासाठी पुन्हा आक्रमक ; जिल्हाधिकारी, आयुक्तांना स्मरणपत्र

सात दिवसांत ठोस कार्यवाही न झाल्यास आंदोलन छेडणार-विनोद जगताप

धुळे शहर

शहरातील मिलपरिसरातील तुळसाबाई मळा तसेच इतर वसाहतींमधील रहिवाशांच्या हक्काचा सातबारा मिळावा यासाठी जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांना दि. १२ सप्टेंबर रोजी सामूहिक स्वरूपात स्मरणपत्र देण्यात आले. विनोद जगताप यांच्यासह परिसरातील असंख्य नागरीक यावेळी उपस्थित होते. नागरिकांनी शासन व महापालिकेच्या ठरावानुसार मंजूर असलेले ७/१२ उतारे, सिटी सर्व्हे उतारे तसेच पंतप्रधान आवास योजनेचा लाभत्वरीत देण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

तुळसाबाई मळा भागातील रहिवाशांना हक्काचा सातबारा मिळावा, रहिवाशी क्षेत्र एन ए करुन सिटी सर्वे उतारे मिळावे यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून येथील रहिवाशी आंदोलनासह पाठपुरावा करीत आहेत.

अर्जदार विनोद मंगा जगताप यांच्यासह परिसरातील अनेक नागरिकांनी स्वाक्षरी केलेल्या स्मरणपत्रात नमूद केले आहे की, झोपडपट्टी धारकांसाठी महासभेत मंजूर करण्यात आलेली पंतप्रधान आवास योजनेतील अडीच लाख रुपयांची मदत आजतागायत मिळालेली नाही. महापालिकेने लेआऊट मंजूर करून महसूल खात्याशी पत्रव्यवहार करून नागरिकांना ७/१२ देणे अपेक्षित होते, मात्र अद्याप ठोस कार्यवाही झालेली नाही. खाजगी जमिनधारकांच्या जागेत ३० ते ४० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या गरीब रहिवाशांसाठीही दिलासादायक ठराव मंजूर असूनही त्यावर कोणतीही प्रगती झालेली नाही. यासोबतच साईबाबा नगर व आंबेडकर नगर येथील नागरिकांना ७/१२ उतारे दिले असले तरी पंतप्रधान आवास योजनेचे लाभ अद्याप मिळालेले नाहीत. तर मिल परिसरातील तुळसाबाईचा मळा, रासकर नगर, गुरुकृपा नगर, हटकरवाडी, शेलारवाडी, राऊळवाडी, धनगरवाडा, सिताराम माळी चाळ, अयोध्या नगर, लिलाबाई चाळ, चक्करबर्डी, देशमुख नगर आदी वस्त्यांतील रहिवाशांनाही या योजनेपासून वंचित ठेवले असल्याची खंत स्मरणपत्रात व्यक्त करण्यात आली आहे.

महापालिकेच्या महासभेतील ठराव, राज्य शासनाचे सुधारित आदेश व १५,४३० तसच ४५० आणि १००० चौ. फुटांच्या निकषांनुसार मंजुरी असूनही केवळ दिरंगाई होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. विकास कामांच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च होत असताना झोपडपट्टी धारकांना न्याय मिळत नाही, अशीही नाराजी व्यक्त करण्यात आली. सात दिवसांत ठोस कार्यवाही न झाल्यास लोकशाही मार्गाने बेमुदत आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

स्मरणपत्रावर विनोद मंगा जगताप, सुनील ठाकूर, सिताराम काळे, योगेश चौधरी, अनिल मुसमुडे, सर्जेराव माने, राजेंद्र शिंदे, महादू कोळी, गणेश खंडाळे, निलेश पवार, विजू शिरसाट, विशाल केदार, भटु कोळी, देविदास ठाकूर, संजय धुमाळ, प्रविण मराठे, भरत महाजन, सोनू सपकाळ यांच्यासह अनेक नागरिकांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *