धुळे जिल्हा
न्यायालयाने आदेश देऊनही गुलमोहर प्रकरणी अजूनही दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात येत नाही. धुळे पोलिसांना न्यायालयाचा आदेश धुडकवण्यासाठी गृह खात्याचा पूर्ण पाठिंबा आहे काय? असा प्रश्न करीत शिवसेना उबाठा नेते, माजी आमदार अनिल गोटे यांचे आज पत्रकार परिषदेत गुलमोहर घबाड प्रकरणी पुन्हा हल्लाबोल केला.
यावेळी गोटे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सोमवार दिनांक २१ जून २०२५ रोजी माननीय मुख्य न्यायदंडाधिकारी साहेबांनी, शासकीय विश्रामगृह गुलमोहर येथे दिनांक २१ व २२ मे च्या मध्यरात्री आढळलेल्या १ कोटी, ८४ लाख, ८४ हजार, २००/- रुपयांच्या घबाड प्रकरणी धुळे पोलिसांनी मुंबई पोलीस कायदा कलम १२४ अंतर्गत गुन्हा दाखल केला. सदर कलम हे अदखलपात्र आहे. त्या कलमान्वये अगदी गुन्हा सिद्ध झाला तरी तीन महिन्याची साधी शिक्षा आणि ५०० रुपये मात्र दंड अशी तरतूद आहे. असे असतांना धुळे पोलिसांनी मात्र केवळ १२४ कलमाखाली गुन्हा रजिस्टर केला.
या संबंधात माजी आमदार अनिल गोटे यांनी राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव, गृहसचिव, महाराष्ट्राचे राज्यपाल, पोलीस महासंचालक या सर्वांकडे दाद मागितली. परंतु दुर्दैवाने एवढा गंभीर गुन्हा घडूनही, या संबंधात पोलीस महासंचालकापासून ते धुळे जिल्हा पोलीस अधीक्षकापर्यंत या संबंधात कुठलीही दखल घेतली नाही. एवढेच नव्हे तर, साधी पोहोच देण्याचे सौजन्य देखील दाखविलेले नाही.
अखेरीस अनिल गोटे यांनी, धुळे येथील माननीय मुख्य न्याय दंडाधिकारी कुबेर चौगुले साहेब यांचे न्यायालयात दाद मागितली. माननीय न्यायालयाने सरकार पक्षाचे व मा.आ. अनिल गोटे यांचे सविस्तर म्हणणे ऐकून घेऊन, येत्या २४ तासाच्या आत दखलपात्र गुन्हा दाखल करण्याबद्दल तातडीचे आदेश पारित केले.
परंतु दुर्दैवाने धुळे पोलिसांनी न्यायालयाचे आदेश सुद्धा पायदळी तुडवले आहेत. एवढेच नव्हे तर, सदर माननीय न्यायालयाच्या दखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे आदेशास आव्हान देण्याचे धाडस, धुळ्याचे पोलीस कुणाच्या पाठींब्यावर अथवा हमीवर करीत आहे? असा सवाल माजी आमदार अनिल गोटे यांनी आज पत्रकार परिषदेत उपस्थित केला. तसेच राज्याच्या गृह खात्याचा सुद्धा धुळे पोलिसांना पूर्ण पाठिंबा असल्याचे व न्यायालयाच्या आदेशाचा भंग करा ! आम्ही पाहून घेऊ ! असे आश्वासित केल्याबद्दलची माहिती, एका जबाबदार पोलीस अधिकार्याने स्वतःचे नाव न सांगण्याच्या अटीवर आपणास सांगितल्याचा दावा देखील अनिल गोटे यांनी पत्रकाव्दारे केला आहे.
भाजपाने प्रशासनामध्ये तर गोंधळ घातलाच, पण यापेक्षा भयानक म्हणजे आता न्यायालयीन व्यवस्थेतही त्यांचा हस्तक्षेप होत असल्याचे हे एक मूर्तीमंत उदाहरण आहे. असे ही अनिल गोटे यांनी शेवटी आपल्या पत्रकात म्हटले आहे.