२६ ते २८ सप्टेंबर दरम्यान पुन्हा पावसात वाढ ! खानदेशात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित !!

 

नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता नागरिकांनी सतर्क राहावे

मुंबई

बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, आणि त्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांमध्ये २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान ढगाळ हवामान आणि पावसात वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. राज्यात किमान ५ ऑक्टोबरपर्यंत तरी मान्सून निरोप घेण्याची शक्यता नाही. खानदेशात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.

२६ तारखेला दक्षिण विदर्भ आणि लगतच्या मराठवाड्यात दुपारनंतर ढगाळ हवामान आणि पावसात वाढ होऊ शकते. यात गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यांचा समावेश आहे. उर्वरित विदर्भ आणि मराठवाड्यात आभाळी हवामान आणि हलका पाऊस पडू शकतो.

२६ तारखेच्या तुलनेत २७ आणि २८ रोजी राज्यात पावसाच्या प्रमाणात आणि क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज आहे. २७ तारखेला दक्षिण मराठवाड्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यात नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांचा समावेश आहे. उर्वरित मराठवाड्यात देखील पावसात वाढ होऊ शकते, ज्यामुळे या भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. याच बरोबर दक्षिण विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील काही भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो, तर उर्वरित विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा लगतचे मध्य महाराष्ट्रातील जिल्हे, सोलापूर, येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस पाडण्याचे संकेत आहेत. या दिवशी खानदेशात प्रामुख्याने हलका पाऊस पडू शकतो.

२८ तारखेला इतर भागांच्या तुलनेत पावसाचा जोर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अधिक राहण्याची शक्यता आहे. या दिवशी अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी, आणि रायगड जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. याच बरोबर मुंबई महानगरात (मुंबई शहर, ठाणे आणि पालघर जिल्हे) पाऊस अपेक्षित आहे, काही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याचे संकेत आहेत. पश्चिम विदर्भ, पश्चिम मराठवाडा आणि खानदेशात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे, तर उर्वरित विदर्भात प्रामुख्याने हलका पाऊस पडू शकतो.

शेतकऱ्यांनी हवामानाच्या या अंदाजानुसार शेतीचे नियोजन करावे. काढणी केलेली पिके पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावीत, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. दक्षिण मराठवाडा; कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरातील धरण साठ्यात वाढ होऊन नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *