धुळे जिल्हा
पिकाच्या वाढीसाठी युरिया हे खत अत्यंत महत्त्वाचे असून प्रत्यक शेतकरी त्याचा वापर करतो. म्हणून युरियाचा काळाबाजार होणार नाही याची दक्षता कृषी विभागाने घेवून, शेतकऱ्यांना वेळेवर युरिया उपलब्ध करून द्यावा. प्रसंगी कृषी सेवा केंद्रावर विभागाचा माणूस नेमून पारदर्शक पद्धतीने युरिया शेतकऱ्यांना वेळेवर मिळण्यासाठी व काळाबाजार होणार नाही यासाठी नियोजन करावे अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी कृषी विभागाला दिल्यात.
पालकमंत्री जयकुमार रावल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागाचा सविस्तर आढावा घेतला. नियोजित पद्धतीने प्रत्येक विभागाने काम करावे. तसेच जिल्हा विकास आराखडा तयार करून विकासाचे नियोजन करावे अशा सूचना प्रत्येक विभागाला केल्या..
मंत्री रावल पुढे म्हणाले की, युरिया खताचा काळाबाजार करून मोठ्या प्रमाणावर कृत्रिम तुटवडा निर्माण करण्याचा प्रयत्न होतो.त्यामुळे शेतकऱ्यांना युरिया खत मिळत नाही.काही ठिकाणी युरिया खताला जोडून इतर खते दिली जातात. त्यामुळे शेतकरी अडचणीत येतो. या सर्व गोष्टी रोखण्यासाठी कृषी विभागाने नियोजन करून शेतकऱ्यांना वेळेवर युरिया खताचा पुरवठा करावा कृषी निविष्ठा विक्री पारदर्शक होईल, शेतकरी फसला जाणार नाही याची काळजी विभागाने घ्यावी. प्रसंगी कृषी सेवा केंद्रावर कृषी विभागाने आपला कर्मचारी नेमावा.तसेच युरिया खताबरोबर इतर मिश्र खतांचा पुरवठा जिल्ह्यात वेळेवर होईल याची ही काळजी ही विभागाने घ्यावी अशी सूचना मंत्री जयकुमार रावल यांनी केली.