समृद्धी महामार्गाप्रमाणे रेल्वे प्रकल्पासाठी जमिनीला दर द्या! धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचा पवित्रा

धुळे तालुक्यात मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध; जमीन मोजणी पुन्हा रखडली

धुळे जिल्हा

समृद्धी महामार्गाच्या वेळी जसा जमिनींना दर देण्यात आला, तसाच दर रेल्वे प्रकल्पासाठीही दिला तरच आमच्या जमिनी मनमाड इंदोर रेल्वे मार्गासाठी देऊ अशी भूमिका घेत धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज जमीन मोजणीची प्रक्रिया रोखून धरली.

धुळे जिल्ह्यातील बोरविहीर-नरडाणा रेल्वे मार्गानंतर आता  मनमाड-इंदूर या महत्त्वाकांक्षी नव्या रेल्वे मार्गासाठी सुरू झालेल्या भूसंपादन प्रक्रियेलाही शेतकऱ्यांचा तीव्र विरोध वाढत चालला आहे. धुळे तालुक्यातील आर्वी आणि पुरमेपाडा भागातील जमिनींची मोजणी सुरू करण्यासाठी आलेल्या पथकाला शेतकऱ्यांनी जोरदार विरोध दर्शविला त्यामुळे शासकीय पथकाने जमीन मोजणी न करताच आज काढता पाय घेतला.

मनमाड – धुळे – इंदोर रेल्वेच्या जमीन संपादन करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने नोटीस जारी केल्यानंतर धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला असून, मोजणी प्रक्रियेलाच विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन, रेल्वे प्रशासन तसेच पोलीस यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

धुळे तालुक्यातील आर्वी गावालगत आज मोजणीसाठी महसूल व रेल्वे विभागाचे अधिकारी आले असता, मोठ्या संख्येने शेतकरी घटनास्थळी जमा झाले. योग्य दर जाहीर झाल्याशिवाय कोणतीही मोजणी होऊ देणार नाही, अशी भूमिका घेत संतप्त शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना जमीन मोजणीचे काम थांबवण्यास भाग पाडले. काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. अखेर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अधिकाऱ्यांनी मोजणी न करता माघार घेतली. यामुळे तूर्ततरी शेतकरी प्रशासन यातील टोकाचा संघर्ष टळला.

दरम्यान, या प्रश्नावर तोडगा न निघाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शेतकरी संघटनांकडून देण्यात आला आहे. धुळे तालुक्यातील नऊ गावांमधून जाणाऱ्या या मार्गासाठी सुमारे ३५० हेक्टर सुपीक शेती जमीन संपादित केली जाणार आहे.

शेतकऱ्यांच्या म्हणण्या नुसार शासनाकडून ज्या दराने मोबदला दिला जात आहे, तो सध्याच्या बाजारभावाच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. समृद्धी महामार्गाच्या वेळी जसा दर देण्यात आला, तसाच दर रेल्वे प्रकल्पासाठीही द्यावा, अशी ठाम मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच टप्प्याटप्प्याने रक्कम न देता वन टाइम सेटलमेंट करून संपूर्ण मोबदला एकाच वेळी द्यावा, अशीही काही शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *