आमदार अग्रवाल : १७ सप्टेंबरपासून दोन ऑक्टोबरपर्यंत रोज विविध लोकोपयोगी कार्यक्रम
धुळे
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा येत्या १७ सप्टेंबरला अमृतमहोत्सवी अर्थात ७५ वा वाढदिवस आहे. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाची पर्वणी साधत भारतीय जनता पक्षातर्फे देशभरामध्ये सेवा पंधरवडा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत भाजपच्या धुळे महानगर शाखेतर्फे १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान समाजातील तळागाळातील घटकांसाठी जिल्हा प्रशासन, महापालिका, विविध सामाजिक संस्था, संघटनांच्या सहकार्याने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यात पक्षाच्या प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्त्याने सक्रीय योगदान द्यावे, असे आवाहन आमदार अनुप अग्रवाल यांनी केले.
सेवा पंधरवडा नियोजनासंदर्भात सोमवारी (ता. ८) सायंकाळी मालेगाव रोडवरील जनसंपर्क कार्यालयात पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली, तीत आमदार अग्रवाल बोलत होते. बैठकीत सेवा पंधरवड्यात घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. तसेच प्रत्येक कार्यक्रमासाठी संबंधित पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली. भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंपळकर, प्रदेश सरचिटणीस डॉ. सुशील महाजन, माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रदीप कर्फे, पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष जयश्री अहिरराव, ज्येष्ठ नेते हिरामण गवळी, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वैशाली शिरसाट, सरचिटणीस जितेंद्र शहा, ओमप्रकाश खंडेलवाल, शशी मोगलाईकर, भिकन वराडे, मुन्ना शितोळे, संदीप बैसाणे, किशोर चौधरी, अरुणा पवार, भाजयुमोचे आकाश परदेशी, बंटी मासुळे, पवन जाजू, पंकज धात्रक, प्रथमेश गांधी, सुनील कपिल, कमलाकर पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी हिरामण गवळी यांनी प्रास्ताविकात पक्षाच्या सूचनेनुसार सेवा पंधरवड्यांतर्गत करावयाच्या कार्यक्रमांची माहिती दिली. श्री. अंपळकर यांनी प्रदेश स्तरावरून येणारा प्रत्येक कार्यक्रम-उपक्रम यशस्वी करण्याची परंपरा यावेळी आपण जोपासत नेहमीप्रमाणे राज्यात प्रथम क्रमांकाचे काम करूया, त्यासाठी सर्वांनी या कार्यक्रमांच्या नियोजनात सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.
आमदार अग्रवाल म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या ११ वर्षांपासून देशातील गरीब, शोषित, वंचित घटकांच्या कल्याणासाठी अविरत प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या नेतृत्वात विकसित भारत, आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडियाच्या धोरणांनुसार भारताने गेल्या ११ वर्षांत आपला मोठा दबदबा निर्माण केला आहे. आज संपूर्ण जग भारताकडे भविष्यातील महासत्ता म्हणून पाहत आहे. त्याचे श्रेय पंतप्रधान मोदी यांना जाते. यामुळे आपल्या नेत्याच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा राबवून त्यांना अनोख्या शुभेच्छा देऊया. त्यासाठी पक्षाच्या प्रत्येक शिलेदाराने प्रामाणिकपणे सक्रीय योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी आमदार अग्रवाल यांनी १७ सप्टेंबरपासून तारीखनिहाय राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती व ते उपक्रम पार पाडण्यासाठी संयजकांची निवड जाहीर केली.
सेवा पंधरवड्यातील तारीखनिहाय उपक्रम असे
१७ सप्टेंबर- स्वच्छता अभियान- विविध सामाजिक, स्वयंसेवी संस्था, संघटना, महापालिकेच्या सहकार्याने शाळा, महाविद्यालये, बसस्थानक, रेल्वेस्थानक, रुग्णालये, मंदिरे, उद्याने आदी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता अभियान राबविणे. याच दिवशी श्री विश्वकर्मा जयंतीनिमित्त मंडळनिहाय प्रतिमापूजन करणे. १८ सप्टेंबर- प्रशासन व लोकसहभागातून एक पेड माँ के नामअंतर्गत शहरातील विविध खुले भूखंड, मोकळ्या जागांवर नमो पार्क निर्माण करून वृक्षारोपण करणे. याच दिवशी रात्री मिल परिसरातील क्रांती चौकात कीर्तन. १९ सप्टेंबर- पक्षातर्फे मंडळनिहाय वृक्षारोपण. याच दिवशी मंडळनिहाय रक्तदान शिबिर. २० सप्टेंबर- महापालिकेच्या सहकार्याने शहरातील आरोग्य केंद्रांमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर. २१ सप्टेंबर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित पुस्तक, साहित्याचे शाळा-महाविद्यालयांत प्रदर्शन भरविणे. याच दिवसापासून ३० सप्टेंबरपर्यंत शहरातील चित्रपटगृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित डाक्युमेंटरी फिल्म दाखविणे. तसेच नवरात्रोत्सवात विविध मंडळांच्या माध्यमातून नागरिकांना डाक्युमेंटरी फिल्म दाखविणे. २२ सप्टेंबर- शहरातील व्यापारी, ज्येष्ठ नागरिक, वकील, उद्योजक, डॉक्टर आदी घटकांसाठी विकसित भारत या विषयावर तज्ज्ञांच्या उपस्थितीत चर्चासत्र, व्याख्यान. २३ सप्टेंबर- विविध क्रीडा प्रकारांमध्ये राज्य, आंतरराज्य, राष्ट्रीय स्तरावर यशस्वी ठरलेल्या खेळाडूंचा सत्कार करणे. याच दिवशी दिव्यांग बांधवांना सायकलचे वाटप, कर्णयंत्रांचे वाटप. २४ सप्टेंबर- नगावबारी परिसरातील केंद्रीय विद्यालयात डबा पार्टी, एक पेड माँ के नामअंतर्गत वृक्षारोपण. २५ सप्टेंबर- पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक बूथवर प्रतिमापूजन, मिठाईवाटप. जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासनाच्या सहकार्याने स्वदेशीचा जागर करणे. २६ सप्टेंबर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर प्रकाशित पुस्तके, साहित्याचे शाळा-महाविद्यालयांसह पक्ष कार्यालय, मंडळांमध्ये प्रदर्शन भरविणे. २७ सप्टेंबर- भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून विकसित भारत, आत्मनिर्भर भारत, व्यसनमुक्त भारतचा जागर करण्यासाठी मॅरेथॉन भरविणे. २८ सप्टेंबर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या `मन की बात’ कार्यक्रमाचे मंडळनिहाय आयोजन करणे. याच दिवशी रात्री मोहाडी उपनगरमध्ये कीर्तन. २९ सप्टेंबर- राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजनेतून वगळलेल्या महिलांच्या कागदपत्रांची छाननी करून त्यांची पूर्तता करत त्यांना लाभ मिळवून देणे. याच दिवशी आझादनगरमध्ये कीर्तन. ३० सप्टेंबर- विकसित भारत या विषयावर विविध वयोगटांसाठी मंडळनिहाय चित्रकला स्पर्धा घेणे. १ ऑक्टोबर- नवरात्रोत्सवांतर्गत विविध मंडळांच्या ठिकाणी स्वच्छता अभियान राबविणे. महिला व पुरुषांसाठी मंडळनिहाय विविध वैयक्तिक व सांघिक क्रीडा स्पर्धा घेणे. याच दिवशी साक्री रोडवर कीर्तन. २ ऑक्टोबर- महात्मा गांधी, माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त मंडळातील बूथनिहाय, पक्ष कार्यालय, आमदार कार्यालयात प्रतिमापूजनाचा कार्यक्रम.
भाविकांसाठी चहावाटप, नवदुर्गांचा सन्मान
याशिवाय नवरात्रोत्सवानिमित्त आदिशक्ती श्री एकवीरादेवी मंदिरात दर्शनासाठी पहाटेपासून पायी येणाऱ्या महिला-पुरुष भाविकांसाठी चहाचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच भाजपच्या महिला आघाडीतर्फे नवरात्रोत्सवात नऊ दिवस शहरातील नऊ मंदिरांमध्ये रोज देवीला साडी-चोळीचा आहेर अर्पण करण्यात येणार आहे. याशिवाय पक्षाच्या मंडळनिहाय रोज १० ते १२ वर्षांआतील मुलींचे कुमारिका पूजन व त्यांना भोजन देण्यात येणार आहे. भाजप महिला आघाडीतर्फेच नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरासह परिसरातील विविध क्षेत्रांत आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या महिलांना नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शिवाय २६ सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरदरम्यान मिल परिसरात संत इंद्रदेव महाराजांच्या कथेचा कार्यक्रम होणार आहे.