धुळे शहर
धुळे शहरात भर रस्त्यावर थेट पिस्तुलांमधून गोळीबार करीत तिघांनी सावरकर चौकातून तब्बल ७० लाखांचे सोने असलेली बँग मुंबई येथील जव्हेरी बाजारातल्या ’व्ही.एम.ज्वेलर्स’च्या विक्री प्रतिनिधींच्या हातातील बॅग ओरबाडून नेल्याने एकच खळबळ उडाली आहे.
सुमारे ७० लाख रुपये किमतीचे १२०० ते १५०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे आणि सोन्याच्या पावत्या त्या बँगेत होत्या. शहादा येथून धुळ्यात आलेल्या एस.टी. बसमधून दोघे जण खाली उतरले आणि त्याचवेळी मोटार सायकलवर आलेल्या तिघा लुटारुंपैकी एकाने जमिनीवर आणि नंतर हवेत गोळीबार केला. दहशत निर्माण करून काही कळण्याच्या आतच त्यांनी बॅग हिसकावली व नदी काठच्या रस्त्याने मुंबई-आग्रा महामार्गाच्या दिशेने सुसाट पसार झाले.
या प्रकरणी विनय मुकेश जैन (वय २८ वर्षे) रा.जय अपार्टमेंट ६० फुटी रस्ता, बी विंग १०५, भाईंदर जि.ठाणे यांनी देवपूर पोलीस ठाण्यात लेखी फिर्याद दिली आहे. त्या नुसार, धुळे शहरातील पांझरा नदीकाठी स्वा.सावरकर पुतळ्यासमोर २३ जुलै रात्री आठ ते साडेआठच्या दरम्यान ही थरारक घटना घडली. शहाद्याहून (जि. नंदुरबार) निघालेली बस बुधवारी रात्री साधारण आठ वाजेला स्वा.सावरकर पुतळ्या जवळ थांबली.या बस मधून मुंबई येथील व्ही. एम.अँड सन्स ज्वेलर्स लिमिटेड १२/१४ अत्तरवाला बिल्डिंग, दुसरा मजला मिर्झा स्ट्रीट मुंबई उद्या कंपनीचे विक्री प्रतिनिधी विनय मुकेश जैन आणि कर्शन मोदी हे उतरले,ते काही पावले चालत नाहीत तोच दुचाकीवरून आलेल्या तिघांपैकी एकाने जमिनीवर आणि हवेत गोळ्या झाडल्या व दहशत निर्माण केली.काही कळण्याच्या आत दुचाकीवरील तिघांनी जैन यांच्या हातातील बॅग हिसकावून पळ काढला.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकार्यांसह तपास यंत्रणेतील महत्वाच्या विभागाच्या अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि घटनास्थळाची पाहणी केली असता दोन काडतुसे पोलिसांच्या हाती लागली असल्याचे कळते.विनय जैन व मोदी यांच्याकडील बॅगेत तीन किलोहून अधिक सोने असल्याचे घटनास्थळी प्राथमिक चर्चेतून म्हटले गेले, तथापि प्रत्यक्षात मात्र ७० लाख रुपये किमतीचे १२०० ते १५०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे असल्याचा फिर्यादित उल्लेख आहे.घटना घडल्यावर घाबरलेल्या विनय मुकेश जैन आणि किशन मोदी यांना देवपूर पोलिस ठाण्यात नेले आणि घटनाक्रमाची चौकशी सुरू केली.
देवपूरचे पोलिस निरीक्षक समाधान वाघ यांच्या उपस्थितीत रात्री एक वाजेला पोलिसांनी या गुन्ह्यांची नोंद केली.लुटारुंनी रेकी करत हा किमती ऐवज लांबविल्याचा प्राथमिक निष्कर्ष तपास यंत्रणांनी काढला.संशयित तिघांपैकी दोघांकडे बंदूक होती अशी माहिती विनय जैन आणि किशन मोदी यांनी पोलिसांना दिली आहे. विनय जैन व कर्शन मोदी हे २१ जुलै पासून धुळे व परिसरात दागिन्यांच्या व्यवहारासाठी मुक्कामी होते.त्यांनी बुधवारी (ता. २३) अक्कलकुवा व तळोदा (जि नंदुरबार) येथील काम आटोपले आणि शहादा येथून रात्रीच्या एसटी बसने धुळ्याला परतले.यावेळी ही घटना घडली. धुळ्यात पाहोचल्यावर दोघांनी वर्दळ राहणार्या सावरकर पुतळ्याजवळ उतरणे का पसंत केले,याबद्दलही आता पोलिसांकडून माहिती घेतली जाते आहे.
दरम्यान,जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे,अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे,उपअधीक्षक राजकुमार उपासे,गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार हे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी संशयितांच्या तपासासाठी आवश्यक असलेली माहिती घेतली. तसेच लुटारुंच्या शोधासाठी तात्काळ वेगवेगळी आठ विशेष शोध पथके तयार करुन ती रवाना करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक समाधान वाघ यांनी दिली आहे.