शासकीय विश्रामगृहात पाया भरणीसाठी रॉयल्टी न भरता मुरूम टाकण्याचा प्रताप !
माफीयांनी खडी मुरुमाची चालवलेली लूट थांबवा, कठोर कारवाई करा – शिवसेना उबाठा वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
धुळे शहर
धुळे शहरातील शासकीय विश्रामगृह ‘गुलमोहर’ पुन्हा एकदा चर्चेत आले असून येथे कोट्यवधीच्या ‘कॅश कांड’ नंतर आता अवैध ‘मुरूम कांड’ सुरू असल्याचा सनसनाटी आरोप शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला. येथे सुरू असलेल्या नवीन इमारतीच्या पाया भरावसाठी चितोड शिवारातून शासकीय रॉयल्टी न भरताच अवैधपणे मुरूम उत्खनन करून आणला जात असल्याचे प्रत्यक्ष केलेल्या पाहणीत आढळल्याचे सेनेच्या पदाधिकऱ्यांनी म्हटले आहे. याबाबत कारवाई ची मागणी करीत आज निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.
ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दावा केला, गुलमोहर विश्रामगृह येथे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता सुमारे 5 स्क्वेर पाया फुटाचे सुमारे दहा हजार स्क्वेअर फुटाच्या नवीन इमारतीच्या पायाभरणी साठी चितोड लगतच्या चव्हाण वस्ती मधुन 250 ब्रास मुरूम परवा रात्रीपासून टाकला जात असून त्याची परवानगी व रॉयल्टी भरली नाही, शासनाचा महसूल बडवुन सर्रासपणे तो मरूम टाकण्याचे काम सुरू असताना संबंधित ठेकेदाराने चुकीच्या रॉयल्टी पावत्या दाखवून प्रशासनाची दिशाभूल केली.
या ठिकाणी ठेकेदाराने 200 ते 250 ब्रास टाकलेला मुरूम हा पुरावा असल्याने आपण या दोघांना निलंबित करून आपण गौण खनिज संपत्ती लुटारुंच्या विरुध्द आहात, व आपण कर्तव्यात किती कठोर व गंभीर आहात हे दाखवून द्यावे, तसेच गुलमोहर रेस्ट हाऊस येथील सीसीटीव्ही फुटेज मधून विनापरवानगी टाकलेल्या मुरमाचे पुरावे आपण जप्त करावेत अन्यथा ते देखील नष्ट होण्याची शक्यता असून आमच्या तक्रारीची आपण गांभीर्याने दखल घेऊन कठोर कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन आज निवासी उपजिल्हाधिकारी यांना शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी ,धीरज पाटील ,भरत मोरे, सुनील पाटील, निंबा मराठी,पिंटू ठाकूर पंकज भारस्कर ,कपिल लिंगायत, दिनेश पाटील संदीप चौधरी, माहदु गवळी, पिनू सूर्यवंशी, भोला गोसावी, सागर निकम, तेजस सपकाळ आदींनी दिले.
तहसील कार्यालयातील “नाना” चलवतो रॅकेट !
अप्पर तहसीलदारांच्या माध्यमातून कोणीतरी नाना नावाचा शासकीय कर्मचारी अवैध गौण खनिज लुटीचे ‘रॅकेट’ चालवतो, वास्तविक या नानाच्या गौण खनिज परवानगीचा चार्ज काढून घेतल्यानंतर तो चार्ज सोडायला तयार नाही, असा आत बट्ट्याचा गौण खनिज वाहतुकीचा व्यवहार अप्पर तहसीलदार व नाना मुळे तेजीत आहे या दोघांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी देखील शिवसेना उबाठा वतीने करण्यात आली आहे.