नवीन औद्योगिक धोरणात धुळे जिल्ह्याला `ड प्लस’पेक्षा अधिकचा दर्जा ; आमदार अनुप अग्रवाल यांच्या पाठपुराव्याचा नवउद्योजकांना मोठा ‘लाभ’

धुळ्यात उद्योग सुरू करणाऱ्या नवउद्योजकांना अतिरिक्त अनुदानाची मिळणार संधी

धुळे जिल्हा

: राज्य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या नवीन औद्योगिक धोरण २०२५ मध्ये धुळे जिल्ह्याला `ड प्लस’पेक्षा अधिकचा दर्जा जाहीर केला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे धुळे शहरासह जिल्हाभरात नवीन उद्योग उभारणाऱ्या नवउद्योजकांना त्यांच्या गुंतवणुकीच्या प्रमाणात अतिरिक्त १५ टक्के अनुदानाच्या लाभाची संधी प्राप्त होणार आहे. या संदर्भात शहराचे आमदार अनुपभय्या अग्रवाल यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. या निर्णयासाठी आमदार अग्रवाल यांनी मुख्यमंत्री फडणवीस व उद्योगमंत्री सामंत यांचे आभार मानले आहेत.

या संदर्भात आमदार अग्रवाल यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की धुळे जिल्ह्याशेजारील जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आदी जिल्ह्यांमध्ये औद्योगिक विकासाला चालना मिळत गेल्याने ते जिल्हे विकासाबाबत धुळ्याच्या खूपच पुढे गेले आहेत. त्या तुलनेत धुळे जिल्ह्याची मात्र नेहमीच उपेक्षा झाली. यामुळे धुळे जिल्हा आजही अविकसित म्हणून ओळखला जातो. वास्तविक, सद्यःस्थितीत धुळे जिल्ह्यात अक्कलपाडा प्रकल्प, सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन प्रकल्प पूर्णत्वास येत असल्याने उद्योगांसाठी पाणीपुरवठ्याचा विषय निकाली निघाला आहे. याशिवाय धुळे जिल्ह्यातून सात राष्ट्रीय महामार्गांचे जाळे विणले गेले असून, धुळे-नरडाणा रेल्वेमार्गाचे कामही प्रगतिपथावर आहे. तसेच दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर प्रकल्पांतर्गतही धुळे जिल्ह्याची निवड झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील नरडाणा व धुळे शहरातील औद्योगिक वसाहतींच्या विकासाला चालना मिळू शकते. त्यासाठी शासनाच्या नवीन औद्योगिक धोरणात धुळे जिल्ह्याला `ड प्लस’पेक्षा अधिकचा दर्जा मिळाला, तर निश्चितच औद्योगिक विकासाला चालना मिळून धुळे जिल्हाही प्रगतीच्या दिशेने झेपावू शकेल.

या पार्श्वभूमीवर नवीन औद्योगिक धोरणात जिल्ह्याला `ड प्लस’पेक्षा अधिकचा दर्जा द्यावा, यासाठी आमदार अनुपभय्या अग्रवाल यांनी गेल्या वर्षी जूनमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्योगमंत्री उदय सामंत यांना निवेदने देत या संदर्भात बैठक घेऊन या प्रश्नावर तोडगा काढण्याबाबत विनंतीही केली होती. तसेच या मागणीबाबत मुख्यमंत्री फडणवीस, उद्योगमंत्री सामंत यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या नवीन औद्योगिक धोरणात धुळे जिल्ह्याला `ड प्लस’पेक्षा अधिकचा दर्जा बहाल केला आहे. यामुळे जिल्ह्यात नवीन उद्योग स्थापन करणाऱ्या उद्योजकांना त्यांच्या गुंतवणुकीवर अतिरिक्त १५ टक्के अनुदानाचा लाभ मिळण्याची संधी प्राप्त झाली आहे. या निर्णयामुळे धुळे शहरासह जिल्हाभरात जास्तीत जास्त उद्योग सुरू होण्यास प्रोत्साहन मिळणार असून, जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. शासनाच्या या निर्णयाबद्दल आमदार अग्रवाल यांनी मुख्यमंत्री फडणवीस व उद्योगमंत्री सामंत यांचे आभार मानले आहेत.

” धुळे जिल्ह्याला नवीन औद्योगिक धोरणात `ड प्लस’पेक्षा अधिकचा दर्जा मिळाल्याने नवीन उद्योग सुरू करणाऱ्या उद्योजकांना त्यांच्या गुंतवणुकीच्या प्रमाणात १५ टक्के अतिरिक्त अनुदानाचा लाभ मिळणार आहे. हा शासन निर्णय व्हावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. आता हा निर्णय झाल्यामुळे निश्चितच अनेक नवीन उद्योजक आकर्षित होऊन जास्तीत जास्त गुंतवणुकीतून नवीन उद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन मिळेल. तसेच जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळून धुळे जिल्हाही प्रगतीच्या दिशेने झेपावू शकेल. शिवाय स्थानिक युवकांना रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी प्राप्त होणार आहेत.”

-अनुपभय्या अग्रवाल, आमदार, धुळे शहर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *