महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक

 

ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक

ठाणे

नौपाडा भागातील घंटाळी परिसरातील अतिक्रमणावर कारवाई करून मुंबईतील बिल्डरला सहकार्य करण्याकरिता ५० लाखांची मागणी करून त्यातील २५ लाखांच्या लाचेची रक्कम स्वीकारताना ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) मुंबई पथकाने बुधवारी सायंकाळी रंगेहाथ अटक केली. रात्री उशिरापर्यंत नाैपाडा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू हाेती.

एसीबीच्या सूत्रांनुसार, मुंबईतील एका बांधकाम व्यावसायिकाची घंटाळी परिसरात जागा आहे. या जागेवर अतिक्रमण झाले होते. हे अतिक्रमण हटविण्यासाठी पाटोळे यांनी ५० लाखांच्या लाचेची मागणी केली हाेती. यातील दहा लाख रुपये संबंधित बांधकाम व्यावसायिकाने त्यांच्याकडे काही दिवसांपूर्वी सुपूर्द केले हाेते. त्यानंतर उर्वरित ४० लाख रुपये देण्याआधी या बांधकाम व्यावसायिकाने थेट मुंबईच्या एसीबीकडे तक्रार केली. मुंबई एसीबीच्या विशेष पथकाने बुधवारी सापळा रचून पाटोळे यांना उर्वरित ४० पैकी २५ लाखांची लाच स्वीकारताना अटक केली. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी कार्यालयातील कागदपत्रांची उशिरापर्यंत छाननी केली. त्याचवेळी त्यांच्या घरी सर्च ऑपरेशन राबविण्यात आले.

गेल्या काही महिन्यांपासून ठाणे महापालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामांवर मोठ्या प्रमाणात कारवाया सुरू आहेत. न्यायालयाने अनधिकृत बांधकामांवरून आयुक्त राव यांना अक्षरश: धारेवर धरल्यावर ही कारवाई सुरू झाली. मात्र, ठाण्यातील अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणारे हेच अधिकारी असल्याचे आता उघड झाले आहे. कारवाई करण्याकरिता व न करण्याकरिताही लाचेची मागणी होत असल्याचेच संकेत या कारवाईमुळे प्राप्त झाले. योगायोगाने ठाणे महापालिकेचा बुधवारी ४३ वा वर्धापनदिन होता. याच दिवशी ही कारवाई झाल्याने महापालिकेच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसल्याचे बाेलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *