धुळे जिल्हा
महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेतर्फे १५ जुलैपासून विविध मागण्यांसाठी धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची दखल घेत आज आमदार अनुप अग्रवाल यांनी आंदोलनस्थळी भेट देत परिचारिकांच्या मागण्या जाणून घेतल्या. यानंतर आमदार अग्रवाल यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री जयकुमार रावल यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधत आंदोलनाची माहिती दिली. यावेळी दोन्ही मंत्रिद्वयींनी मंगळवार दि. २२ रोजी आमदार अग्रवाल यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन परिचारिका संघटनेच्या मागण्या आणि भावना पोहोचविण्याची ग्वाही दिली. तसेच परिचारिकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासनही देण्यात आले. तसेच आंदोलन मागे घ्यावे असे आवाहन केले.
महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेतर्फे राज्यभरात गेल्या १५ जुलैपासून विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. यामध्ये वेतनातील त्रुटींचे निवारण करावे, परिचर्या संवर्गातील शुश्रुषा, शैक्षणिक व अशैक्षणिक पदांची कायमस्वरूपी १०० टक्के पदभरती, पदनिर्मिती व पदोन्नती करावी, नवीन आकृतिबंध निर्माण करावा, केंद्र सरकारप्रमाणे भत्ते मिळावेत, प्रोत्साहन भत्ता द्यावा आदी मागण्या आहेत. परिचारिका संवर्गातील अधिपरिचारिका, परिसेविका, पाठ्यनिर्देशिकांच्या आंदोलनामुळे धुळे शहरातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालयात दाखल रुग्णांना विविध सेवा मिळण्यात अडचणी येत आहेत. यामुळे आमदार अग्रवाल यांनी आज भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात सुरू असलेल्या परिचारिका संघटनेच्या आंदोलनस्थळी भेट देत त्यांच्या मागण्या व समस्या जाणून घेतल्या. यावेळी आमदार अग्रवाल यांनी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सयाजी भामरे यांनाही पाचारण करत मागण्यांबाबत चर्चा केली. संघटनेच्या पदाधिकार्यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत विस्तृत विवेचन करत शासनाकडे या मागण्या पोहोचवाव्यात, अशी मागणी केली.
परिचारिका संघटनेच्या मागण्या जाणून घेत त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आमदार अग्रवाल यांनी उत्तर महाराष्ट्राचे नेते तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन, जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या आंदोलनस्थळावरून फोनद्वारे संवाद साधत परिचारिका संघटनेच्या आंदोलनाबाबत व रुग्णसेवेत येत असलेल्या अडथळ्यांबाबत माहिती दिली. यावेळी स्पिकर फोनवरून मंत्री महाजन, मंत्री रावल यांनी आपल्या मागण्यांचे लेखी निवेदन आमदार अग्रवाल यांच्याकडे द्यावे. ते उद्या मुंबईत आल्यानंतर त्यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत तुमच्या मागण्या त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याची ग्वाही दिली. तसेच या प्रश्नी तातडीने तोडगा काढण्याचे व प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेचे आश्वासन परिचारिका संघटनेला दिले.
मंत्रिद्वयींशी चर्चा केल्यानंतर आमदार अग्रवाल यांनी मंत्रिद्वयींच्या सूचनेनुसार त्यांच्या नेतृत्वात मी स्वतः उद्या मुंबईला जाऊन तुमच्या मागण्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचविण्याची ग्वाही दिली. यामुळे संघटनेने आता आपले आंदोलन मागे घेण्याचे आवाहनही केले.