धुळे जिल्हा
मोहाडी नगर पोलिसांनी राजस्थान हून मुंबईकडे निघालेल्या संशयास्पद स्कॉर्पिओ वाहनातून जवळपास साडेनऊ लाख रुपये किमतीची अफूची बोंडे व वाहन असा सुमारे २४ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी स्कॉर्पिओ चालकास ताब्यात घेतले असून कारवाई सुरु होताच अन्य एक संशयित घटनास्थळावरून पसार झाला.
आज पहाटे साडेपाच वाजेला लळींग टोलनाक्याच्या पुढे ही कारवाई झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या कारवाईत जवळपास १५ लाख रुपये किमतीचे वाहन व अफूची बोंडे असा सुमारे २४ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई मोहाडी नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्यासह पथकातील पंकज चव्हाण, मुकेश गोरे, प्रकाश जाधव,मनीष सोनगिरे व रमेश शिंदे यांच्या पथकाने केली. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे व अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी नगर पोलिसांच्या पथकाने ही कारवाई पूर्ण केल्याची माहिती देण्यात आली.