धुळे जिल्हा
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्यावतीने जिल्हयातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामपंचायत अधिकारी आशा वर्कर, स्वच्छागृही यांच्यासाठी आज ऑनलाइन प्रशिक्षण घेण्यात आले. पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री प्रदीप पवार, धुळे महापालिकेच्या लसीकरण क्षेत्रीय अधिकारी श्रीमती रोहिणी जगदेव, यांनी सहभागीना सविस्तर मार्गदर्शन करून आरोग्याची काळजी घेण्याबाबत आवाहन केले.
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत जिल्हा हागणदारी मुक्त अधिक करण्यासाठी व शाश्वत स्वच्छतेसाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.विशाल नरवाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री चंद्रकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविले जात आहेत. तसेच दिनांक 22 मे 2025 ते दिनांक 5 जून 2025 या कालावधीत प्लास्टिक प्रदूषण निर्मूलन मोहीम अंतर्गत उपक्रम राबविणे बाबत शासन स्तरावरून निर्देश देण्यात आले होते.
त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री प्रदीप पवार म्हणाले की, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मासिक पाळी व्यवस्थापन हा महत्वाचा घटक आहे . मासिक पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया असून त्याबाबत असलेल्या अज्ञान व अंधश्रद्धेतून निर्माण झालेल्या विविध रूढी-परंपरांमुळे मुली-महिलांना मोठ्या प्रमाणात मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागते. त्या पार्श्वभूमीवर किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळी बाबत जनजागृती होणे आवश्यक आहे. म्हणून गावपातळीवर कार्यरत प्रशिक्षित महिलांनी हा विषय घराघरात पोहचवावा असे आवाहन श्री प्रदीप पवार यांनी केले.
श्रीमती रोहिणी जगदेव यांनी यावेळी किशोरवयीन मुली तसेच महिला, मासिक पाळी आणि आरोग्य, आहार,विहार,व्यायाम याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
मासिक पाळीबाबत अनेक गैरसमज,चुकीच्या प्रथा असून त्यामुळे अनेकदा आरोग्याच्या समस्या निर्माण होत असल्याचे सांगून घरात या विषयावर मोकळेपणे बोलने आवश्यक असल्याचे सांगितले. प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी जिल्हा कक्षातील अधिकारी – कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.