धुळे जिल्हा
महाराष्ट्रात औद्योगिक, कृषी, आरोग्य, शिक्षण, पर्यटन आणि डिजिटल क्षेत्रात मोठया प्रमाणात गुंतवणूक होत आहे. या क्षेत्रात भविष्यात रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होणार असल्याने तरुणांनी या नव्या रोजगाराच्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी आज केले.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, धुळे , मॉडेल करिअर सेंटर आणि शिक्षण महर्षी दादासाहेब रावल नॉलेज सिटी, दोंडाईचा यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे जिल्हास्तरीय पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे उद्घाटन पालकमंत्री श्री. रावल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
या मेळाव्यास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे ,जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक, अप्पर तहसीलदार संभाजी पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी, जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त राजू वाकुडे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री जयकुमार रावल म्हणाले की,राज्य सरकारच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहेत. यात मेक इन इंडिया आणि मेक इन महाराष्ट्र उपक्रमांतर्गत इलेक्ट्रॉनिक्स, सेमीकंडक्टर, इलेक्ट्रिक वाहने, लॉजिस्टिक्स, वेअरहाउसिंग व सप्लाय चेन व्यवस्थापन यामध्ये हजारो रोजगार निर्माण होत आहेत.
सौर व पवन उर्जेवर आधारित प्रकल्प, ईव्ही चार्जिंग स्टेशन्स आणि ग्रीन बिल्डिंग्स यामध्ये 2029 पर्यंत 10 लाखांहून अधिक रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे.
यात योग्य तयारी केल्यास ग्रामीण भागातील युवकही यशस्वी होऊ शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मिळेल त्या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले. यावेळी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्यात.
प्रास्ताविकात सहाय्यक आयुक्त राजू वाकुडे म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कौशल्य विकास विभागामार्फत संपूर्ण महाराष्ट्रात 100 रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. धुळे शहरांमध्ये दोन प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन केलेले आहे. तर दोंडाईचा येथे जिल्हास्तरीय पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या रोजगार मेळाव्यामध्ये जवळजवळ 25 विविध क्षेत्रातील कंपन्यांनी सहभाग नोंदवलेला असून, या कंपन्यांच्या माध्यमातून जवळपास 1 हजार पेक्षा जास्त रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून 3200 लाभार्थ्यांनी लाभ घेतला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी प्राचार्य के.डी गिरासे यांनी संस्थेविषयी माहिती दिली. मेळाव्याचे सूत्रसंचालन डी.एम. गिरासे यांनी तर व्ही.एम.गिरासे यांनी आभार मानले. या मेळाव्यास संस्थेतील प्राध्यापक व कर्मचारी तसेच विद्यार्थी, विद्यार्थींनी तसेच विविध कंपन्याचे प्रमुख व प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते.