खगोल पर्यटनासोबतच इको-टूरिझम, शैक्षणिक आणि साहसी पर्यटनाला मिळणार चालना
जळगाव
जळगाव जिल्ह्यातील यावल वन विभागाच्या अंधारमळी परिसरात महाराष्ट्राचे पहिले ‘डार्क स्काय पार्क’ आकाराला येत आहे. यामुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. नुकत्याच झालेल्या चंद्रग्रहणाच्या मुहूर्तावर या ऐतिहासिक प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. हा प्रकल्प केवळ खगोलप्रेमींसाठीच नाही, तर विज्ञान, पर्यटन, रोजगार आणि ग्रामीण विकासाचा अनोखा संगम घडवणारा आहे.
नॅशनल स्पेस डे 2025 निमित्ताने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वाकांक्षी घोषणा केली. देशातील पहिले ‘डार्क स्काय पॉलिसी’ राबवणारे राज्य म्हणून महाराष्ट्र लवकरच ओळखला जाईल, असे त्यांनी सांगितले. प्रकाशप्रदूषण कमी करून आकाशाचे नैसर्गिक सौंदर्य टिकवणे आणि तरुण पिढीला विज्ञानाशी जोडणे ही काळाची गरज आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. त्यांच्या या दूरदृष्टीतूनच हे पार्क साकारले जात आहे. यामुळे युवकांना रोजगार, विद्यार्थ्यांना विज्ञानाचे ज्ञान आणि जिल्ह्याला जागतिक पातळीवर नवी ओळख मिळेल असे आमदार अमोल जावळे यांनी या प्रकल्पाचे महत्त्व स्पष्ट केल.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी हा प्रकल्प केवळ पर्यटन आकर्षण नसून, ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी एक ‘जिवंत विज्ञान प्रयोगशाळा’ ठरेल असे सांगितले. उपवनसंरक्षक शेख म्हणाले की, अंधारमळीतील अत्यल्प कृत्रिम प्रकाशप्रदूषणामुळे हे ठिकाण डार्क स्काय पार्कसाठी आदर्श आहे. यामुळे स्थानिक तरुणांना ‘ॲस्ट्रोगाईड’ म्हणून प्रशिक्षण मिळेल आणि महिला बचतगटांना होमस्टे व हस्तकलेतून रोजगार मिळेल. जंगल संवर्धन आणि उत्पन्नाचा समन्वय साधण्याचा हा एक यशस्वी प्रयत्न असल्याचे हि सांगितले.
आशियातील डार्क स्काय डिफेंडर पुरस्कार विजेत्या श्वेता कुलकर्णी यांनी अंधारमळीला भेट दिल्यानंतर, हे ठिकाण भारताच्या पहिल्या प्रमाणित डार्क स्काय पार्कसाठी योग्य असल्याचे मत व्यक्त केले. भविष्यात संपूर्ण यावल वन विभाग ‘डार्क स्काय संरक्षित क्षेत्र’ म्हणून विकसित होऊ शकते, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
या प्रकल्पामुळे जळगाव जिल्ह्याचाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलणार आहे, 50 हून अधिक थेट आणि 150 हून अधिक अप्रत्यक्ष रोजगार संधी निर्माण होतील, खगोल पर्यटनासोबतच इको-टूरिझम, शैक्षणिक आणि साहसी पर्यटनाला चालना मिळेल, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खगोलशास्त्राचे प्रत्यक्ष ज्ञान मिळेल, प्रकाशप्रदूषण नियंत्रणात येऊन जैवविविधतेचे संरक्षण होईल, महाराष्ट्र ‘डार्क स्काय पॉलिसी’चे नेतृत्व करणारे देशातील पहिले राज्य म्हणून ओळखले जाईल, चंद्रग्रहणाच्या साक्षीने सुरू झालेला हा प्रकल्प महाराष्ट्राच्या गौरवशाली वाटचालीतील एक मैलाचा दगड ठरेल अशी अपेक्षा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी व्यक्त केली जात आहे.