अयोध्या मंदिरात प्रभु श्रीराम दरबाराची प्राण प्रतिष्ठा
सुरतच्या भक्ताने केले हिर्यांनी जडलेले दागिने दान
अयोध्या
अयोध्येतील राम मंदिरातील राम दरबाराची प्राण प्रतिष्ठा अभिजित मुहूर्तावर आज संपन्न झाली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राम दरबाराची पूजा केली. अभिषेक कार्यक्रम सकाळी ११.२५ ते ११.४० पर्यंत पार पडला. राम दरबार रामलल्लाच्या गर्भगृहाच्या वर म्हणजेच पहिल्या मजल्यावर बांधण्यात आला आहे.
त्यात भगवान राम, माता सीता, तीन भाऊ- लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न तसेच हनुमानजी यांच्या मूर्ती आहेत. सुरतमधील व्यापारी मुकेश पटेल यांनी राम दरबारासाठी हिरे, सोने आणि चांदीचे दागिने दान केले आहेत.
विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष दिनेश नेवाडिया म्हणाले की, दान केलेल्या दागिन्यांमध्ये एक हजार कॅरेटचा हिरा, ३० किलो चांदी, ३०० ग्रॅम सोनेा, ३०० कॅरेट माणिकापासून ११ मुकुट बनवले गेले आहेत. याशिवाय, चारही भावांसाठी हार, कानातले, कपाळावर टिळक, धनुष्य आणि बाण आहेत.
हे दागिने चार्टर्ड विमानाने अयोध्येत आणण्यात आले. ते राम मंदिर ट्रस्टला दान करण्यात आले. रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा २२ जानेवारी २०२४ रोजी म्हणजेच ४९८ दिवसांपूर्वी झाली.
गेल्या वर्षी राम लल्लाच्या प्राण प्रतिष्ठेसाठी देशभरातील मोठ्या उद्योगपती आणि चित्रपटसृष्टीतील व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले होते. आज राम दरबाराच्या अभिषेकासाठी ३५० लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यापैकी बहुतेक ट्रस्टचे अधिकारी आणि संत आहेत. जयपूरमध्ये राम दरबाराच्या मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. या मूर्ती मकराना येथील पांढर्या संगमरवरापासून बनवल्या आहेत. भगवान श्री राम आणि सीता सिंहासनावर विराजमान आहेत. भरत आणि हनुमान भगवान श्री रामाच्या पायाजवळ बसले आहेत.