‘लोकवृत्त संपादकीय’
कुणाल पाटलांच्या भाजप प्रवेशाचे नाट्य
आणि जवाहर- अँकर गटबाजीची आठवण..
========
होणार-होणार प्रवेश म्हणत
लोकसभा-विधानसभा झाली!!
निर्णय नक्की होताच चर्चा…
कोण वर, नि कोण खाली?
स्व.दाजी नि अण्णा-भाई
एकत्र कधी आले का?
निवडणुकीचे घोडे यांचे
एकाच नदीत न्हाले का?
विधानसभा जिंकली खरी
भविष्य पुढे कसे असेल,
आता इथे कुठे नव्हे तर
‘राम’ स्वतःच्याच मंदिरात बसेल !!
========
” 2014 आणि 2019 च्या निवडणुकीवेळी सुद्धा मला भाजप प्रवेशासाठी विचारणा झाली , स्वतः फडणवीसांनी भाजपात येण्याचे आणि उमेदवारी करण्याचा आग्रह केला, पण आपली तीन पिढ्यांची कॉग्रेसची परंपरा आहे, ती कशी सोडू ? असे म्हणत आपण त्यांना त्यावेळी नकार दिला होता. पण आता केवळ स्वतःची प्रतिमा जपत बसणार नाही, कार्यकर्त्यांच्या हितासाठी निर्णय घ्यावा लागेल.” अशी भूमिका कॉग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांनी पक्ष बदलाच्या किंबहुना भाजपात प्रवेश करण्याबद्दल मांडली आहे. स्पष्टपणे भाजपात जाणार की नाही हे अजूनही न बोलता कुणाल पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात वेळ मागून उद्यापर्यंत कळवतो! असे सांगत सस्पेन्स कायम ठेवला.
माजी आमदार कुणाल पाटलांच्या या तळ्यात मळ्यात भूमिकेने अजूनही राजकीय प्रवेश नाट्य रंगत असले तरी यानिमित्ताने कॉग्रेसमध्ये पूर्वी असणारे जवाहर- अँकर गट… रोहिदास दाजी आणि अमरिश भाई , द. वा. आण्णा यांच्यातील राजकीय गटबाजी व त्यातून झालेला शह काटशहाचे राजकारण या भूतकाळातील चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे. स्व. दाजी, भाई आणि अण्णा यांचे कधी जमलेच नाही, ते कधी एकत्र आले नाहीत..मग आता कुणाल पाटील जर भाजपात जाणार तर त्यांच्या प्रवेशाने आधीच भाजपात असणाऱ्या त्यांच्या राजकीय विरोधकांना ते कितपत पचनी पडणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कुणाल पाटील यांच्या भाजपवासी होण्याने धुळे जिल्ह्यातील राजकिय समीकरण बदलणार हे निश्चित ! पहिला सवाल तर धुळे ग्रामीण मध्येच असेल.. ज्या राम भदाणे यांनी कुणाल पाटलांचा विधानसभेत पराभव केला ते आणि त्यांचे समर्थक कुणाल पाटील यांना कसे स्वीकारतील ? पूर्वी कॉग्रेसमध्ये होते तसे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूकीत हे दोन गट जुळवून घेतील का? कुणाल पाटील यांना मानाचे स्थान तर भाजपला द्यावे लागेल त्यावेळी आमदार राम भदाणे आणि इतर भाजपतील मंडळी कशी प्रतिक्रिया देणार ? यात कोण खाली आणी कोण वर.. हा मुद्दा समर्थक जरूर विचारणार.
तसेच कुणाल पाटील यांच्या रूपांत कॉग्रेसचे मास लिडर भाजपात येत असल्याने भाजपातील जिल्हा नेत्यांना सुद्धा त्यांच्यासाठी मानाचे स्थान मोकळे करावे लागू शकते.! अशा वेळी मनाचा मोठेपणा कोण आणि कसा दाखवेल ? हा सुद्धा एक सवाल राजकीय वर्तुळात चर्चेत आला आहे. कॉग्रेसमध्ये असतांना जे लोक कधी एकत्र आले नाहीत ते भाजपात एकदिलाने काम करू शकतील काय ? असे अनके प्रश्न यानिमित्ताने विचारले जात आहेत.
म्हणूनच ‘लोकवृत्त’च्या शीघ्र कवींनी…
स्व.दाजी नि अण्णा-भाई
एकत्र कधी आले का?
निवडणुकीचे घोडे यांचे
एकाच नदीत न्हाले का?
विधानसभा जिंकली खरी
भविष्य पुढे कसे असेल,
आता इथे कुठे नव्हेतर
‘राम’ स्वतःच्याच मंदिरात बसेल !!
असा सवाल उपस्थित केला आहे. अर्थात याचे उत्तर कुणाल पाटील यांचा भाजपात प्रवेश झाल्यावर आणि पुढील राजकीय घडामोडींवर अवलंबून असेल..!