सर्व निकष बाजूला ठेवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट दिवाळीपूर्वी मदत केली जाणार – मुख्यमंत्री फडणवीस 

_लातूर जिल्ह्यातील उजनी आणि औराद शहाजनी येथे पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन_

लातूर

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज लातूर जिल्हा दौऱ्यावर होते. औसा तालुक्यातील उजनी आणि निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी या ठिकाणी अतिवृष्टी ग्रस्त आणि पूरग्रस्त भागाची पाणी त्यांनी केली. संकटकाळात राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून सर्व निकष बाजूला ठेवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत ही दिवाळीपूर्वी केली जाईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी उजनी येथे ग्रामस्थांशी संवाद असताना व्यक्त केला.

याप्रसंगी त्यांच्यासोबत लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार, आमदार संजय बनसोडे, आमदार रमेश कराड, आमदार राणा जगजितसिंह पाटील, आमदार कैलास पाटील, माजी आमदार बसवराज पाटील, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हेलिकॉप्टरने औसा येथे आले. तिथून ते उजनी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 औसा ते तुळजापूर महामार्गावरील पुलावरून तेरणा नदीपात्राची, तसेच नदीला आलेल्या पुरामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर उजनी गावालगत असलेल्या तेरणा नदीपात्राची व गावातील घरे, दुकानांचे पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतकरी, ग्रामस्थांकडून शेतपिकांच्या नुकसानीची माहिती घेतली. त्यानंतर ते निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी येथील मांजरा आणि तेरणा नदीच्या संगमावर जाऊन पाहणी केली.

याप्रसंगी उजनी येथे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यात अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने नद्यांना पूर आला आहे. पिकांचे मोठ्या नुकसान झाले असून जमीन खरडून गेली आहे. या संकटकाळात राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून सर्व निकष बाजूला ठेवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत केली जाईल. तसेच दिवाळीपूर्वीच ही मदत शेतकऱ्यांना वितरीत करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, संकट काळात राज्य शासन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. टंचाईच्या काळात लागू केल्या जाणाऱ्या उपाययोजना अतिवृष्टीलाही लागू करण्यात येतील. शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत करण्याचा प्रयत्न केला जाईल. अतिवृष्टीमुळे पुराचे पाणी घरात, दुकानात घुसल्याने झालेल्या नुकसानीचीही मदत देण्यात येईल. उजनी गावालगत तेरणा नदीवरऔसा व तुळजापूर तालुक्याला जोडणाऱ्या पूल उभारणी, तसेच उजनी गाव ते राष्ट्रीय महामार्गावरील उजनी मोडला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाला मंजुरी देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

तर औराद शहाजनी येथे पाणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रेरणा नदीवर लवकरच बॅरेज उभारणार असल्याचे जाहीर केले. तसेच मांजर आणि तेरणा नदीच्या संगमावर मोठी संरक्षक भिंत उभारता येते का? याबाबतही विचार करणार असल्याचे सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *