धुळे जिल्हा
साक्री तालुक्यातील लाटीपाडा गावाच्या पुनर्वसन प्रकल्पाला गती देण्याच्या सूचना राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंग आर्या यांनी मंगळवारी लाटीपाडा पुनर्वसन स्थळाला भेट देऊन पाहणी करताना दिली.
या भेटीवेळी त्यांनी महसूल प्रशासनाला लाटीपाडा येथील आदिवासी कुटुंबांचे पुनर्वसन तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. गेल्या अनेक वर्षांपासून लाटीपाडा येथील आदिवासी बांधवांची पुनर्वसनाची मागणी असून या कामास गती देऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची सूचना त्यांनी संबंधितांना केली. आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंग आर्या हे मंगळवारी साक्री तालुक्याच्या दौ-यावर आले होते. त्यांच्या उपस्थितीत पिंपळनेर, तालुका साक्री येथे जन सुनावणी उपक्रमात महसूल सप्ताहातंर्गत लाभार्थ्यांना वनपट्टे वाटप, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभाचे प्रमाणपत्र वाटप तसेच रेशन कार्ड वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला आमदार मंजुळाताई गावित, अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर, जिल्हा पुनर्वसन अधिकारी संजय बागडे, उपविभागीय अधिकारी रोहन कुवर, तहसीलदार साहेबराव सोनवणे, नायब तहसीलदार विजय बहिरम, पोलिस अधिकारी किरण बर्गे, सहायक महसुल अधिकारी यांच्यासह विविध शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमास परिसरातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी शासनाच्या विविध विभागांच्या योजनांच्या माहितीचे स्टॉल देखील लावण्यात आले होते.