धुळे जिल्हा
धुळ्यासह संपूर्ण खान्देशात यंदाही कवनबाई मातेचा जल्लोष पहायला मिळाला. कानुमाता उत्सवाच्या निमित्ताने अनेकांनी आपल्या आप्तस्वकींकडे दर्शनासाठी हजेरी लावली होती. कानुमातेची स्थापना करणाऱ्या भाविकांनी काल रात्रभर जागरण करुन उपासना केली. तर आज सकाळी भाविकांनी कानुमातेला भक्तीमय वातावरणात निरोप दिला. विसर्जन मिरवणुकीसाठी सकाळपासूनच लगबग सुरु होती. काहींनी पारंपारिक वाद्य तर अनेकांनी डीजेच्या तालावर ठेका धरत कानुमातेला निरोप दिला.
राय राय कानबाई जावू नको…. कानबाई चालनी गंगेवरी… यासह विविध गीतांच्या तालावर या मिरवणुका पांझरा नदीकडे प्रस्थान करत होत्या. शहरातील जुने धुळे, बडगुजर प्लॉट, वाखारकर नगर, ऐंशी फुटी रोड, साक्री रोड, मील परिसर आदी भागातून काढण्यात आलेल्या विसर्जन मिरवणुकांनी सायऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.
विविध भागातून काढण्यात आलेल्या मिरवणुकांमध्ये भाविकांनी विविध गीतांच्या तालावर ठेका धरला होता. मिलपरिसरातील विलास जोगी फेटेवाले यांच्या परिवाराने स्थापना केलेल्या कानबाई मातेच्या दर्शनासाठी आणि मिरवणूकीत परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. जाधव परिवाराने भाविकांना प्रसादाचे वाटप केले.
महात्मा गांधी पुतळ्याजवळून जाणाऱ्या मिरवणुकांवर खान्देश तेली समाज मंडळातर्फे यंदाही पुष्पवृष्टी करण्यात आली. पुष्पवृष्टी करण्याचे यंदाचे हे चौथे वर्षे होते.
साक्री, शहरासह तालुक्यात अनेक भाविकांनी कानुमातेची स्थापना केली होती. आज सकाळी कानुमातेला भक्तीमय वातावरणात डीजे व ढोल ताशांच्या गजरात वाजत-गाजत निरोप देण्यात आला. मिरवणुकीदरम्यान अनेक भाविकांनी कानुमातेचे दर्शन घेतले. तर महिला भाविकांनी फुगड्या खेळल्या. विसर्जन मिरवणुकांमध्ये भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने नदीकिनारी विसर्जनस्थळी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.