मोराणे येथील पांझरा नदीलगत बांधलेल्या भिंतीसाठी वापरलेल्या गौणखनिजाच्या रॉयल्टीबाबत माहिती मागविली
*उपविभागीय अधिकारी रोहन कुवर यांची माहिती*
धुळे जिल्हा
मोराणे प्र.ल.ता. धुळे येथील पांझरा नदीलगत असलेल्या गट नंबर 5 मध्ये बांधलेल्या दगडी संरक्षक भिंतीसाठी वापरलेल्या गौणखनिजाच्या रॉयल्टी व वाहतुक परवान्यांबाबत माहिती मागविली असून, माहिती प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी (धुळे) रोहन कुवर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने या भिंतीच्या कामावरून महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले होते. हे काम बेकायदेशीर असल्याचे म्हणत आंदोलन सुरू केले आहे. प्रांताधिकारी व अपर तहसीलदार यांना लक्ष केले आहे. अखेर प्रशासनाने भूमिका स्पष्ट केली आहे.
उपविभागीय अधिकारी रोहन कुवर यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, मोराने प्र. ल. ता. धुळे येथील गट क्र ५ ही जमीन उपविभागीय अधिकारी कार्यालय, धुळे यांचेकडील 7 फेब्रुवारी, 2014 च्या आदेशान्वये नियोजित नानासाहेब पिंगळे लो इन्कम ग्रुप सह. गृहनिर्माण संस्था मर्या. मुख्य प्रवर्तक अनिता चौधरी यांचे अर्जावरून रहिवासी प्रयोजनार्थ बिनशेतीकडे वर्ग करण्यात आली असून 3 जुलै, 2015 रोजी बिनशेतीची सनद मंजूर करण्यात आली आहे. हे आदेश करताना इतर विभागांच्या नादेय प्रमाणपत्र सोबतच तत्कालीन मोराने प्र. ल. ग्रामपंचायतीचा 7 जानेवारी, 2014 रोजीचा ठराव व ना हरकत दाखला, तसेच सदर गट नं. ५ हा पूर रेषेत येत नसल्याबाबत उपविभागीय अभियंता, पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण, उप विभाग धुळे यांचा 15 जानेवारी, 2014 रोजीचा अभिप्राय विचारात घेण्यात आले होते. नगर रचना विभाग धुळे यांच्याकडील 29 जुलै, 2005 ते 27 नोव्हेंबर, 2013 मधील शिफारशीतील अटी शर्तीनुसार रहिवास अभिन्यास मंजूर करताना संरक्षक भिंत बांधण्याबाबत अट टाकण्यात आली होती.
अशी वस्तुस्तिथी असताना 9 ऑगस्ट, 2025 रोजी उपविभागीय अधिकारी, धुळे यांना दूरध्वनीद्वारे प्राप्त तक्रारीनुसार सदर गटात बेकायदेशीर भिंत उभारली असून त्याची चौकशी करणेबाबत मागणी करण्यात आली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी, धुळे यांनी तात्काळ अपर तहसीलदार, धुळे शहर यांना त्यांच्या गौण खनिज पथकामार्फत तक्रारीची खातरजमा करण्याच्या सूचना दिल्या. तसेच स्वतः 11 ऑगस्ट, 2025 रोजी अपर तहसीलदार, धुळे शहर व संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी यांच्यासमवेत त्या जागेची पाहणी केली. त्याठिकाणी दिसलेल्या भिंतीसाठी वापरलेल्या गौण खनिजाबद्दल संबंधित प्रवर्तक यांचेकडून खुलासा मागवून कार्यवाही करण्याच्या सूचना जागेवरच देण्यात आल्या. त्यानुसार 12 ऑगस्ट, 2025 रोजी अपर तहसीलदार, धुळे शहर यांनी मुख्य प्रवर्तक अनिता चौधरी यांचेकडे संरक्षक भिंतीच्या कामी वापरलेल्या गौणखनिजाच्या रॉयल्टी व वाहतूक परवान्यांबाबत माहिती मागवली असून त्यांचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर किंवा वाजवी वेळेत खुलासा प्राप्त न झाल्यास पुढील कार्यवाही करण्यात येईल. असेही उपविभागीय अधिकारी, धुळे भाग, धुळे रोहन कुवर यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.