शिरपूर तहसिल कार्यालयावर शेतकर्यांचा मोर्चा
धुळे जिल्हा
धुळे जिल्हा अतिवृष्टीग्रस्त घोषित करण्यात आला असता तरी शिरपूर तालुक्याचा समावेश न झाल्याने तालुक्यातील शेतकर्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या निषेधार्थ शिरपूर फर्स्ट आणि विविध शेतकरी संघटनांच्या पुढाकाराने आज शिरपूर शहरातून तहसिल कार्यालयावर एल्गार मोर्चा काढण्यात आला.
मोर्चाची सुरुवात शिरपूर शहरातून होत तहसील कार्यालयावर सांगता झाली. हातात फलक, बॅनर आणि घोषणांनी परिसर दणाणून गेला शिरपूरचा अतिवृष्टीत समावेश करा, शेतकर्यांना न्याय द्या, आमचे हक्क आम्हाता द्या अशा घोषणांनी शहरात जनआंदोलनाचे वातावरण निर्माण झाले. शेकडो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते.
यावेळी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात शिरपूर तालुक्याचा अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांच्या यादीत तात्काळ समावेश करण्यात यावा. अतिवृष्टीमुळे बागायती व इतर पिकांचे झालेले नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावी. थकित पिकविमा रक्कम शेतकर्यांना वितरित करण्यात यावी. शासनाच्या कर्जमाफीच्या आश्वासनाची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी. शेतकर्यांना राष्ट्रीयकृत बँकांकडून सहज कर्ज मिळावे. आत्महत्या केलेल्या शेतकर्यांच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी. आदी मागण्या केल्या आहेत.
शेतक-यांचे म्हणणे आहे की, मागील काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे कापूस, सोयाबीन, मका, उडीद यासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दोन शेतकर्यांनी आत्महत्या केल्याची खंत शेतक-यांनी व्यक्त केली.