२२ फेब्रुवारीपासून चारदिवसीय महाप्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा प्रारंभ; धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी
पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार अनुप अग्रवाल यांची उपस्थिती
धुळे शहर
शहरातील चितोड रोडवरील स्मशानभूमीलगत असलेल्या कैलासनगरात उभारण्यात आलेले श्री मुक्तेश्वर महादेव मंदिर दक्षिणात्य शिल्प शैलीत निर्माण झाले असून धुळे शहराच्या धार्मिक तसेच सांस्कृतिक वैभवात मोठी भर घालणारे ठरले आहे. याच सुंदर मंदिराच्या लोकार्पणाचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला असून उद्यापासून त्याची सुरुवात पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या शुभ हस्ते मंदिर लोकार्पनाने होत आहे.
यानिमित्त मिल परिसर धार्मिक रंगात रंगून गेला आहे. सर्वत्र स्वागत फलक भगव्या पताकांची सुंदर सजावट आणि स्वागत कमानींनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले जात आहे.
या मंदिराचा २२ ते २६ फेब्रुवारीदरम्यान महाप्राणप्रतिष्ठा सोहळा, २१ फूट उंच महादेव मूर्तीचे लोकार्पण तसेच दक्षिणमुखी हनुमानमूर्ती प्रतिष्ठा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या पाच दिवसांच्या सोहळ्यात धार्मिक विधींसह भजन, कीर्तन आणि भक्तिगीतांचे कार्यक्रम होणार आहेत.
२२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता मुक्तेश्वर महादेव मंदिराचे लोकार्पण राज्याचे पणन व राजशिष्टाचारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते होणार आहे. याचवेळी २१ फूट महादेव मूर्तीचे लोकार्पण आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, माजी आमदार कुणाल पाटील, खासदार शोभा बच्छाव, आमदार राम भदाणे, महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, आयुक्त नितीन कापडणीस, भाजपा शहर-जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, माजी आमदार शरद पाटील, भाजपा प्रदेश चिटणीस सुशील महाजन, नवी दिल्लीचे भाजपा प्रवक्ते महेश अत्री, माजी नगराध्यक्ष महेश मिस्तरी, शिवसेना जिल्हाप्रमुख मनोज मोरे, सरपंच बाळासाहेब भदाणे, उद्योजक सुमित बोरसे, एमआयएमचे नेते इर्शाद जहागीरदार, स्थायी समितीच्या माजी सभापती वालीबेन मंडोरे, उद्योजक संदीप अग्रवाल, भाजपा नेते जितेंद्र चौटिया, आंतरराष्ट्रीय मानवाधिकारचे उपाध्यक्ष जोसेफ मलबारी, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा धरती देवरे, माजी महापौर कल्पना महाले, जयश्री अहिरराव, प्रतिभा चौधरी, भाजपा गटनेत्या किरण कुलेवार, नगरसेविका सुरेखा उगले, लता पोतदार, गीता नवले आणि बेटी बचाव-बेटी पढावच्या प्रदेश संयोजिका अल्पा अग्रवाल आदी उपस्थित राहणार आहेत.
२३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता टाळ-मृदुंगाच्या गजरात भव्य शोभायात्रा व कलशयात्रा निघणार आहे. ही मिरवणूक चितोड रोड क्रांती चौक, ध्वज चौक, दक्षिणमुखी मारोती मंदिर, स्मशानभूमी मार्गे मंदिर परिसरात दाखल होईल.
२४ फेब्रुवारी रोजी सकाळी सात ते अकरा या वेळेत प्रधानसंकल्प, गणपतीपूजन, पुष्याहवाचन, मातृकापूजन, आयुष्यमंत्र, ब्राह्मणपूजन, अग्निस्थापन, वास्तुपूजन, नवग्रह पूजन, रुद्रकलश, होम-हवन, जलाधिवास, कुटीरहोम, अभिषेक व आरती होणार आहे. दुपारी दोन ते सायंकाळी सहा या वेळेत पूजाअर्चा करण्यात येईल. स्व. द्वारकाआई उत्तमराव गर्दे यांच्या ४३ व्या पुण्यस्मरणानिमित्त रात्री आठ ते दहा या वेळेत जय बाबारी भक्ती मंडळ, धुळे यांचा भजनसंध्या कार्यक्रम होईल.
२५ फेब्रुवारी रोजी सकाळी प्रातःपूजन, स्नपन, दशविधी स्नान, महाअभिषेक, रुद्राभिषेक, प्रधानहवन, दीपोत्सव महाआरती, धान्याधिवास व शय्याधिवास विधी पार पडतील. दुपारी भोजनानंतर पूजाअर्चा होईल. रात्री आठ ते दहा या वेळेत कान्हादेश वारकरी सेवा मंडळ, धुळे यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.
२६ फेब्रुवारी रोजी सकाळी सात ते दुपारी बारा या वेळेत प्रातःपूजन, उत्सवमूर्ती प्राणप्रतिष्ठा, कळशारोहण, ध्वजारोहण, उत्तयंगहवन, नामकरण, बलिदान, पूर्णाहुती, महानैवेद्य व आरती होईल. दुपारी एक ते चार या वेळेत पंडित घनश्याम थोरात यांचा भक्तिगीतांचा कार्यक्रम तसेच महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.
महाप्राणप्रतिष्ठा सोहळा आर्वी येथील रोकडोबा हनुमान मंदिराचे महंत वासूदास महाराज, स्वामीनारायण मंदिराचे महंत आनंदजीवन स्वामी, आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याच्या राज्याध्यक्षा पार्वती नंदगिरी परशुराम जोगी आणि हिंगणी (ता. निझर) येथील मंडलेश्वर भोलेनाथ मठाचे महंत मंगेशगिरी महाराज यांच्या हस्ते पार पडणार आहे. विधी दिव्येश मनोहर जोशी पार पाडणार आहेत.
या सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मुक्तेश्वर महादेव मंदिर महाप्राणप्रतिष्ठा सोहळा उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष मनोज गर्दे, अध्यक्ष अमोल मासुळे, कार्याध्यक्ष गोरख पाटील, उपाध्यक्ष नीलेश नेमाणे व गौरव उगले, कोशाध्यक्ष रोहित परदेशी, सचिव प्रकाश झणके, सहसचिव जितू इखे यांच्यासह पदाधिकार्यांनी केले आहे.