भिल कुटूंबाच्या सामूहिक आत्महत्या प्रकरणात ब्राह्मणे गावच्या तत्कालीन पोलीस पाटलासह तिघांना 10 वर्षे सक्त मजूरीची शिक्षा

धुळे जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती माधुरी आनंद यांचा आणखीन एक लक्षवेधी निकाल

धुळे जिल्हा

एकाच कुटुंबातील 5 जणांना आत्महत्येस प्रवृत्त करीत 4 जणांच्या मृत्यु प्रकरणी धुळे जिल्हा व सत्र न्यायालयाने ब्राह्मणे गावच्या तत्कालीन पोलीस पाटलासह तिघांना प्रत्येकी दहा वर्षे १० सक्त मजूरी आणि पाच हजार द्रव्य दंडाची शिक्षा सुनावली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती माधुरी आनंद यांनी आज हा निकाल दिला.

भिला चंद्रा भिल,चंदर झिपा भिल आणि पोलीस पाटील प्रविण ओंकार पाटील अशी शिक्षा झालेल्या तिघांची नावे आहेत.

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील ब्राह्मणे गावात ११ फेब्रुवारी २०१७ रोजी घडलेल्या या घटनेत आसाराम भवुता भिल, मोठाभाऊ उर्फ विनोद भिल आणि शिवदास आसाराम भिल यांनी धावत्या रेल्वेखाली उडी घेवून आत्महत्या केली होती. यानंतर आपल्या कुटुंबात आता कुणीही पुरुष जिवंत राहिले नाहीत अशी भावना निर्माण झाल्याने आसाराम यांची पत्नी विठाबाई भिल आणि मुलगी वैशाली भिल यांनीही नंतर आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आणि या माय लेकींनीही एका शेतातील कोरड्या विहिरीत उडी घेतली. या घटनेत मात्र वैशालीचे प्राण वाचले आणि विठाबाई भिल या मरण पावल्या.

या प्रकरणी वैशाली भिल यांनी दिलेल्या जबाबावरून नरडाणा पोलीस ठाण्यात भिला चंद्रा भिल, चंदर झिपा भिल आणि तत्कालीन पोलीस पाटील प्रविण ओंकार पाटील यांच्याविरुद्ध एकाच कुटुंबातल्या महीलेसह पाच जणांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला.

फिर्यादीत आणि आसाराम भिल यांनी मृत्यूपूर्व लिहिलेल्या चिट्ठीत म्हटल्या नुसार मुलीची छेड काढल्याच्या संशयावरून वाद घालून भिला चंद्रा भिल यांच्यासह तिघांनी आसाराम भबुता भिल यांच्या कुटुंबाला त्रास देत होते. त्यांच्याशी वाद घालून सतत त्यांचा शारीरीक व मानसीक छळ सुरु केला होता. मृत आसाराम भिल यास गाठून संशयितांनी ‘रात्रीतून गांव सोडून निघून जा किंवा गावच्या फाट्यावर जाऊन जीव दे’ अशी चिथावणी दिली. पुन्हा गावात दिसला,तर तुला परिवारासह ठार मारू अशी धमकी दिल्याने अखेर या भयभीत कुटुंबातील पुरुष मंडळीने सामूहिक आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असा आरोप आहे.

तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान हरीभाऊ माथुरे यांनी या गुन्ह्याचा तपास करतांना घटनास्थळाचा पंचनामा, वैशाली भिल हिची वैद्यकिय तपासणी, मृतांचा शव विच्छेदन अहवाल अशी पुराव्यानिशी माहिती जमा केली. घटनेच्या मुळाशी जाऊन त्यांनी महत्वपूर्ण साक्षीदारांचे जाबजबाब नोंदवून घेतले व तपास पूर्ण केला.आरोप निश्चीतीनंतर संशयितांविरुद्ध न्यायालयांत आरोपपत्र दाखल करण्यात आले. या खटल्याचे कामकाज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती माधुरी आनंद यांच्या समोर झाले.

सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील निलेश भगवान कलाल यांनी फिर्यादी वैशाली भिल, सरकारी पंच साक्षीदार, वैद्यकिय अधिकारी डॉ. अरूणकुमार नागे, तपासी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान माथुरे व पोलीस उप निरीक्षक वर्षा पाटील यांच्यासह सात जणांच्या महत्वपुर्ण साक्ष न्यायालयासमोर नोंदवून घेतल्या.

अभिलेखावर असलेला शवविच्छेदन अहवाल व समोर आलेले पुरावे आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालांचा आधार घेत अतिरिक्त सरकारी वकील निलेश कलाल यांनी प्रभावी युक्तिवाद करून संशयितांनी आसाराम भिल कुटुंबियांस सामुहीक आत्महत्तेस कसे प्रवृत्त केले हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. या गुन्हयासाठी जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी अशी मागणी ऍड. कलाल यांनी यावेळी केली.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश श्रीमती माधुरी आनंद यांनी खटल्याच्या अनुषंगाने झालेला उभय पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यावर सर्व तीनही संशयितांना दहा वर्षे सक्त मजूरी आणि पाच हजार द्रव्य दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यांस संशयितांनी एक महिन्याचा सश्रम कारावास शी शिक्षा भोगायची आहे. जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह योगेंद्रसिंह तवर यांच्या मार्गदर्शनाखाली ऍड.निलेश कलाल यांनी युक्तिवाद केला. त्यांना पोलीस विभागातील पैरवी अधिकारी स्मित चव्हाण,निरंजन साळूखे व विजय पाडुरंग जडे यांचे सहकार्य लाभले.

—————

” गावातील भिला चंद्रा भिल,चंदर झिपा भिल व पोलीस पाटील प्रविण ओंकार पाटील यांच्याकडून सातत्याने छळ होत असल्याने आपण सामूहिक आत्महत्या करीत आहोत. असे मयत आसाराम भिल यांनी त्यांच्या हस्ताक्षरात लिहिलेल्या चिट्ठीत म्हटले आहे.”

-ऍड निलेश भगवान कलाल
(अतिरिक्त सरकारी वकील,धुळे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *