धुळे जिल्हा
धुळे तालुक्यातील बोरी पट्ट्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. अतीवृष्टी सदृश्य पावसाने कापुस, मका, बाजरी, ज्वारी, भाजीपाला आणि फळ बागायतीचे मोठे नुकसान झाले आहे. धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे यांनी महसुल विभागाला सरसकट पंचनाम्याच्या सुचना दिल्या असून त्यानुसार पंचनामा करण्याच्या कामाला वेग आला आहे.
धुळे तालुक्यातील बोरी पट्ट्यातील दोंदवड, निमगुळ, धामणगाव, शिरूड पुरमेपाडा, आर्वी, मोघण, मांडळ, रतनपुरा, बोरकुंड, विंचुर, तरवाडे, हेंद्रुण, नंदाळे, नाणे, सिताणे आदी शिवारांमध्ये गेल्या शनिवारी रात्री, सोमवारी रात्री आणि मंगळवारी दुपारी मुसळधार पाऊस कोसळला. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. धुळे तालुक्यासह जिल्ह्यात आधी पावसाने ओढ दिली होती. आता पिक काढणीच्या प्रसंगी सातत्यपुर्ण पावसासोबत अतीवृष्टीही झाल्याने पिकांचे मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे महसुल आणि कृषी विभागाने दिरंगाई न करता पंचनाम्यास वेग दैण्याच्या सुचना आमदार राम भदाणे यांनी दिल्या.
त्यानुसार महसुलच्या कर्मचार्यांनी बोरी पट्ट्यात नुकसानीचे पंचनामे सुरु केले आहेत. यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब भदाणे, जिल्हा परीषदेचे माजी सदस्य आशुतोष पाटील, जिल्हा परीषदेचे माजी सदस्य प्रभाकर पाटील, श्रीराम पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब देसले, सुनील चौधरी, योगेश पवार, नंदाळे सरपंच योगेश पाटील आदींनी नुकसानीची पाहणी केली.