‘हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता’ मोहीमेचा सीईओ अजीज शेख यांचे हस्ते शुभारंभ

धुळे जिल्हा

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता ही मोहीम सर्व यंत्रणांच्या समन्वयातून प्रभावीपणे राबवावी असे आवाहन धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजीज शेख यांनी आज येथे केले.

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत दिनांक 8 ऑगस्ट 2025 ते 15 ऑगस्ट 2025 या कालावधीत हर घर तिरंगा हर घर स्वच्छता ही मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजीज शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत आज या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी श्री शेख बोलत होते.

कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निशा जाधव, सहाय्यक गटविकास अधिकारी आर डी वाघ, परीक्षाविधीन सहाय्यक गटविकास अधिकारी मोसीन शेख, नवनाथ दापके, उपाभियंता श्रीमती जास्वंदी देवरे, श्रीमती प्रियंका बेहेरे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी नंदकुमार पाटील, किशोर पगारे, प्रफुल चव्हाण यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्र पुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना अजीज शेख म्हणाले की ,स्वच्छ भारत मिशन ग्रामीण या अभियानाची 2014 मध्ये सुरुवात झाली. स्वच्छतेच्या क्षेत्रात क्रांतिकारी बदल या अभियानाने घडवून आणले. ग्रामीण भागात शाश्वत स्वच्छता कायम रहावीत आणि गावे स्वच्छ व सुंदर व्हावीत यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. त्यासाठी विविध उपक्रम सातत्याने राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांनी समन्वय साधून मोहीम यशस्वी करावी. या मोहिमेअंतर्गत जे काही घटक आहेत, त्याची योग्यरित्या अंमलबजावणी करावी. धुळे जिल्हा हा उपक्रमशील जिल्हा आहे, सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारा जिल्हा आहे. त्यामुळे आपल्या जिल्ह्याला साजेसे काम सर्वांनी करावे असे आवाहन श्री शेख यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निशा जाधव यांनी हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता मोहिमेची सादरीकरणाद्वारे उपस्थित यांना माहिती करून दिली.

या मोहिमेअंतर्गत दिनांक 9 ते 11 ऑगस्ट दरम्यान गावागावात सार्वजनिक स्वच्छते करिता सार्वजनिक स्वच्छता मोहीम, स्वच्छता रॅली उपक्रम राबविण्यात येणार आहे. 12 ऑगस्ट रोजी जल जीवन मिशन अंतर्गत पायाभूत सुविधांची स्वच्छता व सुशोभीकरणावर विशेष लक्ष केंद्रित करून रंगकाम सजावट केले जाणार आहे. दिनांक 13 ऑगस्ट रोजी स्वच्छता संवाद आणि जागृती दिन आयोजित करून स्वच्छतेच्या अनुषंगाने विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठका घेण्यात येणार आहे. जलसंवर्धन, भूजल पुनर्भरण, जलस्रोत संरक्षण, प्लास्टिक प्रदूषण याबाबत जनजागृती केली जाणार आहे. 14 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या तयारीचा भाग म्हणून गावातील सार्वजनिक ठिकाण रस्ते, चौक, बाजारपेठांची अंतिम स्वच्छता व सजावट केली जाणार आहे . दिनांक 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येणार असून स्वच्छता चॅम्पियन आणि स्वयंसेवकांचा सत्कार केला जाणार आहे. या मोहिम अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती श्रीमती जाधव यांनी यावेळी दिली. याप्रसंगी उपस्थितांना स्वच्छ, सुजल गाव प्रतिज्ञा देण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील तज्ञ, सल्लागार, बीआरसी , सीआरसी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *