अतिवृष्टीचा फटका बसलेल्या साक्री रोड, नकाणे रोड परिसरात पालकमंत्री रावल, आ.अनुप अग्रवाल यांची पाहणी, यंत्रणा कामाला

धुळे शहर

शहरात शनिवारी व रविवारी झालेल्या जोरदार अतिवृष्टीचा फटका शहरातील साक्री रोड, नकाणे रोडसह देवपूरमधील विविध भागांना बसला. जोरदार पावसामुळे साक्री रोडवरील एकाचे घरही कोसळले. अनेक नागरिकांच्या घरांसह दुकानांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. विविध भागांतील रस्त्यांवर तसेच ठिकठिकाणी पाण्याची तळी साचल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले. याची माहिती मिळताच जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांना सोबत घेत शहराचे संवेदनशील आमदार अनुप अग्रवाल यांनी भर पावसात नागरिकांच्या मदतीसाठी तत्काळ धाव घेतली. तसेच महापालिकेसह विविध विभागांची यंत्रणा तत्काळ कामाला लावत अतिवृष्टीचा फटका बसलेल्या नागरिकांना दिलासा दिला.

शहरात गेल्या शनिवारी तसेच रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे साक्री रोडसह परिसरातील अनेक भागांतील गटारी तुंबल्या होत्या. लहान-मोठ्या नाल्यांना पूर आल्याने ठिकठिकाणी पाणी घुसले. यात अनेकांच्या घरांसह दुकानांमध्येही पाणी शिरल्याने नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले. अनेक भागांत पाण्याची तळी साचली होती. याबाबत माहिती मिळताच आमदार अनुप अग्रवाल स्वतः साक्री रोडसह देवपूरमधील विविध भागां जाऊन परिस्थितीची पाहणी केली. इतकेच नव्हे तर महापालिकेसह अन्य विभागांची यंत्रणा तत्काळ पाचारण करत तुंबलेल्या गटारी, नाल्यांची सफाई करून घेतली. विविध भागांत गटारांवर झालेली अतिक्रमणे तत्काळ हटविण्याचे निर्देशही आमदार अग्रवाल यांनी दिले. तसेच साक्री रोडवरील जे. के. ठाकरे यांच्या हॉस्पिटलजवळी गटारांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तेथेच वाहतुकीला अडथळा ठरणारा वीजखांब तत्काळ अन्यत्र हलविण्याचे निर्देशही दिले. यावेळी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, माजी नगरसेवक बन्सी जाधव, प्रशांत बागूल, योगेश ईशी, प्रदीप बैरागी, निनाद पाटील, अजय पवार, दीपक कोळी, मनपा अभियंता चंद्रकांत उगले, महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

आवास योजनेतून घर देऊ : मंत्री रावल
दरम्यान, अतिवृष्टीमुळे घर कोसळलेल्या साक्री रोडवरील शनीनगरमधील अहिरे कुटुंबीयांची रविवारी पालकमंत्री जयकुमार रावल यांच्यासोबत आमदार अग्रवाल यांनी भेट घेतली. यावेळी अहिरे कुटुंबीयांना धीर देत सांगितले, की तुम्ही काळजी करू नका, प्रधानमंत्री आवास योजनेतून तत्काळ घर बांधण्यासाठी मदत उपलब्ध करून देऊ. याबाबत त्यांनी महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांना तसे आदेश दिले. तसेच अहिरे कुटुंबीयांची तात्पुरती निवासाची राहण्याची सोय तात्काळ करून देण्यासही निर्देश दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *