धुळे शहर
राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या गुड्डया खून प्रकरणातील आरोपी विजय शामराव गोयर ऊर्फ बडा पापा आणि विक्रम ऊर्फ विक्की बाबा शामराव गोयर या दोन्ही भावांना जमीन मंजूर करण्यात आला असला तरी त्यांना धुळे शहरात प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
विजय शामराव गोयर ऊर्फ बडा पापा आणि विक्रम ऊर्फ विक्की बाबा शामराव गोयर, दोन्ही रा.रामदेवबाबा नगर, वडजाईरोड,धुळे अशी दोन्ही संशयितांची नावे आहेत.
१८ जुलै २०१७ सकाळी सव्वा सहा वाजेला धुळे शहरातील पारोळा रोडवर असलेल्या गोपाल टी हाऊस समोर शेख रफीयोद्दीन शेख शफीयोद्दीन ऊर्फ गुड्डया (वय ३३ वर्ष) रा.गरुड कॉलनी, देवपूर धुळे याला तलवारी, लोखंडी कोयते व रॉडसह हल्ला चढवीत आणि बंदूकीतून गोळ्या घालून खून करण्यात आला होता. आर्थिक व गुन्हेगारी वर्चस्व कायम राखण्याच्या उद्देशाने हा निर्घृण खून झाला होता.
या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी अटक करून १८ जणाविरुध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम कायद्याखाली नाशिक जिल्हा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. हे सर्व हल्लेखोर आजही तेथे बंदिस्त आहेत.
यापैकी विजय शामराव गोयर ऊर्फ बडा पापा यास १७ जानेवारी २०२५ रोजी तर विक्रम ऊर्फ विक्की बाबा शामराव गोयर यास २३ जून २०२५ रोजी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने एक लाख रुपयांच्या वैयक्तीक जातमुचलक्यावर काही अटी व शर्ती घालून जामीन मंजूर केला आहे. हे दोन्ही हल्लेखोर नाशिक मध्यवर्ती कारागृहातून बाहेर पडले आणि धुळ्यात त्यांच्या साथीदारांनी जोरदार स्वागत केले. याचे रील चित्रीकरण आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले, या अनुशंगाने या दोन्ही गुन्हेगारांची शहर परिसरात पुन्हा दहशत होण्याची शक्यता आहे.यामुळेच दोन्ही संशयितांना धुळे शहरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
या दोन्ही संशयितांनी न्यायालयातील खटल्यासाठी निश्चित केलेल्या तारखांशिवाय अन्य दिवशी धुळे शहरात प्रवेश करु नये. शहरात यायचे असेलतर त्यांना धुळे जिल्हा सत्र न्यायाधीशांची पुर्व परवानगी असणे बंधनकारक करण्यात आले आहे.
विजय गोयर ऊर्फ बडा पापा किंवा विक्रम ऊर्फ विक्की बाबा गोयर हे धुळे शहरात कुठेही कुणाला दिसले. तर स्थानिक पोलीस ठाणे किंवा ११२ या क्रमांकावर माहिती द्यावी, माहिती देणाऱ्याचे नाव गुपित ठेवण्यात येईल.असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
विजय आणि विक्रम गोयर हे दोन्ही सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरुध्द वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात खुन, दरोडा, चोरी, घरफोडी, दंगल, मारामारी, जिवेठार मारण्याचा प्रयत्न करणे,कट रचणे किंवा दुखापत करणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. विजय गोयर याच्याविरुद्ध विविध स्वरूपाचे १२ तर विक्रम गोयर याच्याविरुद्ध १७ गुन्हे दाखल आहेत.
कोणत्याही गुन्हेगारांचे पोस्टर,बॅनर सार्वजनिक ठिकाणी वा इतर ठिकाणी लावण्यात येवु नये.असे केल्यास पोलीसांतर्फे संबंधितांवर तात्काळ कार्यवाही करण्यात येईल.कोणीही गुन्हेगार व गुन्हेगारीचे उदात्तीकरण करु नये. असे आवाहन देखील पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.