धुळे जिल्हा
धुळ्यातील कामगार विभागांतर्गत येणारी सर्व शासकीय कार्यालये एकाच छताखाली आणण्याच्या उद्देशाने नव्याने उभारण्यात येणार्या कामगार भवनाच्या प्रशासकीय इमारतीसाठी राज्य शासनाच्या कामगार मंत्रालयाने १४ कोटी ७१ लाखांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली, अशी माहिती शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.
आमदार अनुप अग्रवाल यांनी धुळे शहरातील शासकीय कामगार अधिकारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ, धुळे-नंदुरबार जिल्हा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ तसेच सुरक्षारक्षक मंडळाची कार्यालये एकाच छताखाली आणताना नवीन कामगार भवनाच्या प्रशासकीय इमारतीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी राज्याचे कामगारमंत्री आकाश फुंडकर यांच्याकडे गेल्या २१ जूनला निवेदनाद्वारे केली होती. तसेच यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या माध्यमातून सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्यानुसार शासनाच्या कामगार मंत्रालयाने सोमवारी (ता. ७) नवीन कामगार भवनासाठी १४ कोटी ७१ लाख रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता दिली आहे.
कामगार भवनाच्या वर्गीकरणामध्ये शासनाने धुळे जिल्ह्याचा ड प्रकारात समावेश केला असून, शहरातील मुंबई- आग्रा महामार्गावरील अवधान औद्योगिक वसाहतीतील ३१८१ चौरस मीटरच्या भूखंडावर कामगार भवनाची नवीन प्रशासकीय इमारत आकाराला येणार आहे. यामध्ये पार्किंग मजला, पहिला मजला, दुसरा मजला, विद्युतीकरण, आग प्रतिबंधक यंत्रणा, पाणीपुरवठा व जलनिस्सारण, संरक्षक भिंत, प्रवेशद्वार, अंतर्गत रस्ते, भू-विकास, फर्निचर, पार्किंग आदी कामे करण्यात येतील, अशी माहिती आमदार अग्रवाल यांनी दिली. हा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार अग्रवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कामगारमंत्री आकाश फुंडकर, जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांचे आभार मानले आहेत..