सहा महिन्यांच्या पाठपुराव्याला अखेर मिळाले यश
मुख्यमंत्री फडणवीस, वैद्यकीय शिक्षणमंत्री मुश्रीफ, पालकमंत्री रावलांचे आभार
धुळे जिल्हा
धुळे शहरातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पदवी, पदव्युत्तरचे शिक्षण घेणार्या विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या वसतिगृहांच्या दुरुस्तीसह नवीन इमारतींसाठी राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने १७ कोटी ७५ लाख ३८ हजार रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे.
दरम्यान, या निधीमुळे हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतींच्या दोन्ही कामांचा मार्ग मोकळा झाला असून, हा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार अग्रवाल यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचे आभार मानले आहेत.
शहरातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी ७५० विद्यार्थी, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी १६५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या महाविद्यालयात राज्यभरातील गुणवंत विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया उत्तीर्ण होऊन दाखल होतात. त्यांच्या निवासाची चांगली व्यवस्था असावी यासाठी शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला वसतिगृहाचे बांधकाम व जुन्या वसतिगृहाच्या दुरुस्तीसाठी शासनाकडे प्रस्ताव देण्याची सूचना केली होती. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने तसा प्रस्ताव राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाला दिला होता. आमदार अग्रवाल यांनी गेल्या १३ जानेवारीला वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना तसे पत्र देत दोन्ही कामांसाठी निधी देण्याची मागणी केली होती.
या पत्रानुसार आमदार अग्रवाल यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वैद्यकीय शिक्षणमंत्री मुश्रीफ यांच्याकडे सतत पाठपुरावा केला. त्यानुसार शासनाने भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांच्या वसतिगह इमारतीची सुधारणा करण्यासाठी ३ कोटी ३७ लाख व विद्यार्थिनींच्या वसतिगृह इमारतीची सुधारणा करण्यासाठी ३ कोटी ३५ लाख, पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाच्या दुसर्या व तिसर्या मजल्याचे बांधकाम करण्यासाठी ११ कोटी दोन लाख ६४ हजार अशा एकूण १७ कोटी ७५ लाख ३८ हजारांच्या निधीस गेल्या मंगळवारी (ता. १७) प्रशासकीय मान्यता दिली. या कामांच्या प्रशासकीय मान्यतेचा आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला प्राप्त झाला असून, राज्य शासनाच्या येत्या पावसाळी अधिवेशनातील अर्थसंकल्पात अर्थसंकल्पित होऊन निविदा प्रक्रिया होईल.
अधिष्ठाता, विद्यार्थ्यांनी मानले आभार
भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी- विद्यार्थिनींच्या सोयीसाठी आमदार अनुप अग्रवाल यांनी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत वसतिगृहांसाठी १७ कोटींहून अधिक निधी मंजूर करून आणला. यामुळे वैद्यकीय शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांची मोठी सोय होणार आहे. ही दोन्ही कामे मार्गी लावल्याबद्दल भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांसह विद्यार्थ्यांनी आमदार अग्रवाल यांचे आभार मानले.
“भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या निवासासाठी वसतिगृहात सुधारणा करणे व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सोय करण्याची बाब जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाला प्रस्ताव देण्याची सूचना केली. या प्रस्तावाला मंगळवारी प्रशासकीय मान्यता मिळाली असून, दोन्ही कामांसाठी १७ कोटी ७५ लाखांवर निधी मंजूर झाला आहे. हा निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार रावल, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचे आभार मानतो. लवकरच हिरे वैद्यकीय महाविद्यालयात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सुपर स्पेशालिटी होस्टेलसह १०० खाटांचे सुसज्ज नेत्र रुग्णालय सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. तसा प्रस्ताव शासनाला दिला असून, तो मंजुरीसाठी पालकमंत्री रावल यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. लवकरच त्यालाही मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा आहे.”
– अनुप अग्रवाल, आमदार, धुळे शहर