धुळे शहर
वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षापासून कुस्तीचा आखाडा गाजविणारा येथील मल्ल शाहू ऊर्फ सुमित अनिल गायकवाडचा गेल्या वर्षी महाराष्ट्र केसरी कुस्ती चाचणी स्पर्धेवेळी डाव्या खांद्यातून हात निखळला. तेव्हापासून कुस्तीच्या मैदानापासून दूर असलेल्या शाहूच्या डाव्या खांद्यावर आमदार अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेतील एबी फाउंडेशनच्या मदतीमुळे नुकतीच इगतपुरी येथील एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्रक्रिया झाली. चार-पाच महिन्यांच्या विश्रांतीनंतर शाहू पुन्हा एकदा कुस्तीचे मैदान गाजविण्यासाठी सज्ज होणार आहे. गरिबीची परिस्थिती असलेल्या शाहूवर एबी फाउंडेशनच्या सहकार्यामुळे मोफत शस्त्रक्रिया झाली असून, त्याने एबी फाउंडेशनचे आभार मानले आहेत.
शहरातील जुने धुळ्यातील वंजारी गल्लीत वास्तव्यास असलेला शाहू गायकवाड हा २२ वर्षीय तरुण रामदास व्यायामशाळेच्या माध्यमातून २०१५ पासून कुस्तीचा आखाडा गाजवत आहे. लहानपणापासूनच कुस्तीचे वेड असलेला शाहू विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत गेला. त्यातून आतापर्यंत चार वेळा राष्ट्रीय कुस्ती स्पर्धांमध्ये त्याने भाग घेतला. चंडीगड येथे झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठस्तरीय कुस्ती स्पर्धेत त्याने रजतपदक पटकावले आहे. तसेच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील ग्रीको रोमन प्रकारातही त्याने कांस्यपदकाची कमाई केली आहे. याशिवाय विविध कुस्ती स्पर्धांमध्ये त्याने अनेक पारितोषिके पटकावली आहेत. गेल्या वर्षी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या चाचणीत सहभागी झालेल्या शाहूचा डावा हात खांद्यातून निखळला. तेव्हापासून त्याला कुस्ती खेळताना त्रास जाणवू लागला. त्याने शहरातील अस्थिरोगतज्ज्ञांकडे जाऊन उपचार घेतले. तेथे त्याला एमआरआय करण्यास सांगण्यात आले. एमआरआय केल्यानंतर त्याला शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला.
आर्थिक स्थिती बेताचीच
शाहूच्या वडिलांचे २०१८ मध्ये निधन झाले असून, त्याचा मोठा भाऊ शहरातील गांधी पुतळ्याजवळ पानटपरी चालवतो, तर त्याची आई एका सुपर शॉपमध्ये काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविते. कला शाखेच्या तृतीय वर्षात शिक्षण घेणारा शाहूही आपल्या भावाना पानटपरीच्या व्यवसायात मदत करतो. कुटुंबाची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने शस्त्रक्रियेसाठी लागणारा साधारण अडीच ते तीन लाखांचा खर्च त्याच्या आवाक्याबाहेरचा होता. यामुळे कुस्तीचे मैदान कायमचे सोडावे लागते की काय, अशी चुटपूट शाहूच्या आणि त्याच्या कुटुंबीयांच्या मनात होऊ लागली. शाहू काहीसा उदास राहू लागला.
एबी फाउंडेशनची मिळाली माहिती
अखेर शाहूला आमदार अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेतील एबी फाउंडेशनची माहिती मिळाली. त्याने आमदार अग्रवाल यांची भेट घेत आपबीती सांगितली. आमदार अग्रवाल यांनी त्याला धीर देत सर्व त्या मदतीचे आश्वासन दिले. यानंतर एबी फाउंडेशनचे समन्वयक आरोग्यदूत कमलेश देवरे यांनी शाहूला सर्व प्रकारचे मार्गदर्शन आणि मदत देऊ केली. त्यासाठी त्याला इगतपुरी येथील एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी पाठविले. तेथे एमआरआय केल्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला. एबी फाउंडेशनचे समन्वयक देवरे यांनी महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्व त्या कागदपत्रांची पूर्तता करून दिल्याने शाहूवर १५ सप्टेंबरला एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये मोफत यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
शाहू गाजविणार पुन्हा आखाडा
शाहूच्या डाव्या खांद्यावर शस्त्रक्रिया झाली असून, त्याला २५ सप्टेंबरला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. आगामी चार ते पाच महिने विश्रांतीचा सल्ला त्याला देण्यात आला असून, त्यानंतर हळहळू तो कुस्ती स्पर्धांमध्ये पुन्हा एकदा सहभागी होऊ शकेल, असा दिलासा डॉक्टरांनी दिला आहे. यामुळे तब्बल वर्षभरापासून कुस्तीच्या आखाड्यापासून दूर असलेला शाहू एबी फाउंडेशनच्या अमूल्य सहकार्यामुळे पुन्हा एकदा कुस्तीचे मैदान गाजविण्यासाठी सज्ज होणार आहे.
धुळे शहराला उत्तर महाराष्ट्रातील कुस्तीची पंढरी असे संबोधले जाते. संपूर्ण राज्यभरात कुस्तीच्या आखाड्यासाठी सर्वाधिक चर्चेतील धुळ्यातून आतापर्यंत अनेक मल्लांनी राज्य, राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक उंचावला आहे. अवघ्या २२ वर्षांचा मल्ल शाहू गायकवाडही त्यासाठी मेहनत घेत असताना त्याच्या खांद्याला दुखापत झाली. त्याच्यावर योग्य ते उपचार व्हावेत म्हणून एबी फाउंडेशनच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात आला. त्याच्यावर मोफत यशस्वी शस्रक्रिया झाली असून, तो पुन्हा एकदा कुस्तीचा आखाडा गाजवू शकणार आहे, याचा मोठा आनंद आहे. भविष्यातील स्पर्धांसाठी शाहूला भरभरून शुभेच्छा.
-अनुप अग्रवाल, आमदार, धुळे शहर
” गेल्या वर्षी महाराष्ट्र केसरी चाचणी स्पर्धेवेळी डाव्या खांद्याला दुखापत झाली. तेव्हापासून वर्षभर कुस्तीच्या मैदानापासून लांब होतो. डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. मात्र, त्यासाठी अडीच ते तीन लाखांचा खर्च कसा करायचा, हा यक्षप्रश्न होता. अखेर आमदार अनुप अग्रवाल यांची भेट घेऊन त्यांना आपबीती सांगितली. त्यांनी एबी फाउंडेशनच्या माध्यमातून सर्व ती मदत करण्याचे आश्वासन देऊन लगेच कार्यवाहीही केली. त्यामुळे माझ्यावर मोफत यशस्वी शस्त्रक्रिया झाली असून, आगामी चार-पाच महिन्यांच्या विश्रांतीनंतर मी पुन्हा एकदा कुस्तीच्या आखाड्यात उतरू शकणार आहे. ही किमया केवळ आमदार अनुप अग्रवाल, एबी फाउंडेशनचे समन्वयक कमलेश देवरे यांच्या सहकार्यामुळे झाली असून, मी त्यांचा आयुष्यभर ऋणी राहीन.”
-शाहू गायकवाड, युवा मल्ल, धुळे