माजी आमदार कुणाल पाटलांचा भाजप प्रवेशाचा निर्णय ‘अंतर्मना’च्या मान्यतेवर अवलंबून..!!
संपूर्ण जवाहर गट कुणाल बाबांच्या पाठीशी ; जो निर्णय घ्याल तो कार्यकर्त्यांना मान्य..
धुळे जिल्हा
महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष माजी आमदार कुणाल पाटील यांनी पक्ष बदलाबाबत आजही सस्पेन्स कायम ठेवत भाजप प्रवेशाचा निर्णय ‘अंतर्मना’च्या मान्यतेवर अवलंबून असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, संपूर्ण जवाहर गट कुणाल बाबांच्या पाठीशी असल्याची ग्वाही देत जो निर्णय घ्याल तो कार्यकर्त्यांना मान्य असेल, कार्यकर्ते सोबत असतील असा सूर कुणाल पाटील यांनी घेतलेल्या समर्थकांच्या मेळाव्यात उमटला.
गेल्या काही दिवसांपासून धुळे ग्रामीण चे माजी आमदार कुणाल पाटील काँग्रेसचा त्याग करून भारतीय जनता पक्षात जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. कुणाल पाटील यांनी नुकतेच भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्याने या चर्चा अधिकच जोमाने सुरू होत्या. त्यातच काल पालकमंत्री जयकुमार रावल यांची भेट घेतली. 1 जुलै रोजी भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरल्याचे म्हटले जाते. यासर्व पार्श्वभूमीवर आज शनिवारी दुपारी कुणाल पाटील यांच्या धुळे येथील निवासस्थानी कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला.
या मेळाव्यात जवाहर ग्रुपच्या जवळपास सर्वच प्रमुख कार्यकर्त्यांनी कुणाल पाटील यांना ठोस भूमिका घ्यावी आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले. यावर माजी आमदार कुणाल पाटील यांनी “माझे अंतर्मन ज्या गोष्टीला मान्यता देईल, ते मी करणार..मला उद्या पर्यंतचा वेळ द्या. असे म्हटले.
तर माध्यमांशी बोलतांना कुणाल पाटील यांनी, आपणास गेल्या अनेक वर्षांपासून भाजप नेत्यांनी संपर्क साधला आणि पक्ष प्रवेशाची ऑफर दिली मात्र मी त्यांना नम्रपणे नकार दिला. आता ही आपल्या धुळे तालुक्यातील विकास कामे जी प्रलंबित आहेत त्याविषयी मी सत्तेतील व्यक्तींना भेटलो. पालकमंत्री रावल यांची भेट सुद्धा याच मुद्यांवर घेतली. डीपीडिसी अंतर्गत अनेक कामे मंजुरीसाठी आहेत. असा पवित्रा घेत माजी आमदार कुणाल पाटील यांनी भाजप प्रवेशाच्या मुद्यावर सस्पेन्स कायम ठेवला आहे.