आ.अनुपभैय्यांच्या पाठपुराव्याने महापालिका आयुक्तांच्या आदेशाने ३६ खोल्यांतील सफाई कामगारांना अखेर घरभाडे भत्ता लागू

धुळे शहर
धुळे शहरातील मच्छीबाजार भागातील म्युनिसिपल कॉलनीमधील (रामदेवबाबा नगर) ३६ खोल्यांमध्ये वास्तव्यास असलेल्या महापालिकेच्या सफाई कामगारांना अटी-शर्तींच्या अधीन राहून घरभाडे भत्ता लागू करण्याचा आदेश महापालिका आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील यांनी दिला आहे. यामुळे या कामगारांना दिलासा मिळाला आहे. याबाबत आमदार अनुप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार भाजपच्या कामगार मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विजय पवार यांनी सातत्याने महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला.
येथील महापालिकेने २१ जून २०१३ ला मनपा मालकीचे एकूण ११४ घरे सफाई कामगारांच्या नावे करण्याचा ठराव मंजूर केला होता. महापालिकेमार्फत शासन नियमानुसार खरेदीखत केल्यानंतर ही घरे त्याच्या नावांवर होतील, असे नमूद आहे.
विजय पवार यांचा पाठपुरावा
दरम्यान, आमदार अनुप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार भाजप कामगार मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विजय पवार यांनी वेळोवेळी निवेदने देऊन रामदेवबाबा नगरमधील ३६ खोल्यांमध्ये गेल्या २५ वर्षांपासून राहणार्‍या सफाई कामगारांना ते राहत असलेली घरे नावावर करण्याबाबत महापालिकेकडे विनंती केली होती. तथापि, नगररचना विभागाकडील अहवालानुसार ही जागा वक्फ मंडळाची असल्याने सदर खोल्यांची सफाई कामगारांना खरेदी करण्यास अडचणी येत असल्याने तूर्त रामदेवबाबानगर येथील ३६ खोल्यांचे खरेदीखत करता येत नाही. या सफाई कामगारांना घरभाडे भत्ता त्यांच्या वेतनात देण्यात येत नाही. सद्यःस्थितीत कामगारांचे दुसरे व तिसरे वारस लागलेले आहेत. त्यांनादेखील घरभाडे भत्ता देण्यात येत नाही. या पार्श्वभूमीवर या कामगारांना त्यांच्या वेतनात घरभाडे भत्ता लागू करावा, अशी विनंती श्री. पवार यांनी आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील यांच्याकडे केली होती.
नगररचना विभागाचा अभिप्राय
नगररचना विभागाच्या अहवालानुसार सदर जागा मनपा मालकीची असून बी-फॉर्ममध्ये नगरपालिकेकडे त्रुटी नाव दिसून येत आहे. सदर प्रकरणी सीटीएस कार्यालयाकडे मनपाचे नाव लावण्याबाबत अपिलाची कार्यवाही सुरू आहे. यास अधीन राहून पुढील कार्यवाही करण्यास हरकत नाही, असा अभिप्राय दिला आहे. हा अभिप्राय विचारात घेऊन मनपा मालकीच्या रामदेवबाबानगरमधील ३६ खोल्यांमध्ये जे सफाई कामगार २५ वर्षापासून राहत आहेत, त्या सफाई व त्यांच्या वारसांना अटी व शर्तींस अधीन राहून त्यांच्या वेतनात (जुलै-२०२५ पेड-इन ऑगस्ट-२०२५) सुधारित नियमानुसार घरभाडे भत्ता लागू करण्यास मंजुरी देण्यात येत आहे, असा आदेश आयुक्त श्रीमती दगडे-पाटील यांनी दिला आहे.
दरम्यान, महापालिका प्रशासनाने रामदेवबाबा नगरमधील ३६ खोल्यांमध्ये गेल्या २५ वर्षांपासून राहणार्‍या सफाई कामगारांना घरभाडे भत्ता लागू करण्याचा निर्णय घेतल्याने यासाठी पाठपुरावा करणार्‍या आमदार अनुप अग्रवाल यांच्यासह भाजपच्या कामगार मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विजय पवार यांचे सफाई कामगारांनी आभार मानले आहेत.
काय आहेत अटी-शर्ती?
उक्त जागेला मनपा मालकीचे नाव लागल्यानंतर व खरेदी- विक्री अडचण येत नसल्यास सदरची घरे शासन नियमानुसार मनपा मालकीच्या खोल्यांचे खरेदी करण्याची जबाबदारी सफाई कामगार व त्यांच्या वारसांची राहील. त्यासाठी महापालिकेकडून कोणताही खर्च दिला जाणार नाही. तसेच सदर आदेशाबाबत लेखाआक्षेपामध्ये वसुली निघाल्यास सदर रक्कम त्यांच्या वारसांच्या वेतनातून कपात करून वसूल करण्यात येईल व सदर रक्कम भरून द्यावयाची संपूर्ण जबाबदारी सफाई कामगार व त्यांच्या वारसांची राहील. सदर आदेशाची नोंद त्यांच्या सेवापुस्तकात घेण्यात यावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *