धुळेकरांच्या माथी अवाजवी घरपट्टी लादणाऱ्या स्थापत्य कन्सल्टंट ठेकेदारावर गुन्हा दाखल करा शिवसेना उबाठाची मनपा आयुक्तांकडे मागणी

धुळे शहर
 धुळेकरांच्या मालमत्ता मूल्यांकनात महानगरपालिकेस आर्थिक फायदा व्हावा यासाठी मनमानी फेरबदल, मूल्यांकन करीत धुळेकरांच्या माथी अवाजवी घरपट्टी लादणाऱ्या स्थापत्य कन्सल्टंट अमरावती या ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करीत आज शिवसेना उबाठा वतीने आयुक्तांना घेराव घालत निवेदन देण्यात आले.
धुळे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने धुळे महानगरपालिकेच्या महासभेत ठराव करून स्थापत्य कन्सल्टंट अमरावती या कंपनीला धुळेकरांच्या मालमत्तांचे मूल्यांकन करण्याच्या संदर्भात ठेका देण्यात आला, सदर कंपनीला १६ कोटी रुपये देऊन हा ठेका देण्यात आला, सदर ठेकेदाराने संपूर्ण धुळे शहरातील व तसेच धुळे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या सर्व ११ गावांच्या मालमत्तांचे मूल्यांकन करताना चुकीच्या पद्धतीने मूल्यांकन केले तसेच या कामी त्यांनी धुळे महानगरपालिका प्रशासनाची दिशाभूल केली. सदर कंपनीकडून महानगरपालिकेने घालून दिलेल्या अटीनुसार संपूर्ण मालमत्तांचे जीआयएस आधारित प्रत्यक्ष सर्वेक्षण करून युनिक प्रॉपर्टी ऑथॉरिटी कोड नोंदणी वही तयार करणे, मूल्यांकनासाठी तांत्रिक सर्वेक्षण अद्यावत संगणीकृत नकाशे काढणे, वार्ड निहाय मालमत्तांचे डिजिटल फोटो काढणे, संगणकृत नकाशे फोटो डेटावरून जोडणे, झोन प्रमाणे नकाशा तयार करून ऑनलाईन मालमत्ता कर भरणा प्रणाली द्वारा सुधारित मूल्यांकन करून घेणे क्रमप्राप्त होते. या सर्व बाबींचा समावेश असताना त्यांनी आपल्या कामात कामचुकारपणा करून धुळेकरांच्या मालमत्तांचे अव्वाच्या सव्वा मूल्यांकन धुळे महानगरपालिकेचा आर्थिक फायदा करून देण्यासाठी केले. असा आरोप शिवसेना उबाठाच्या वतीने करण्यात आला.
धुळेकरांना आर्थिक नुकसान पोहोचविण्याचे काम या कंपनीने जाणून बुजून केलेले आहे. धुळे महानगरपालिका हि ड वर्ग महानगरपालिका आहे. अकोला अमरावती जळगाव मालेगाव नगर या देखील ड वर्ग महानगरपालिका आहेत. परंतु त्यांच्या मालमत्ता कराच्या दरात व धुळे महानगरपालिकेच्या मालमत्ता कराच्या दरात प्रचंड तफावत आहे. धुळेकरांना भुर्दंड व्हावा अशा ठेकेदाराविरुद्ध बी .एन .एस. कायद्याप्रमाणे फौजदारी गुन्हा दाखल करावेत, धुळेकरांची या झिझिया रुपी जाचक करातून मुक्तता करावी अशी मागणी करत महानगरपालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांना तासभर घेराव टाकून मालमत्ता कर विभागाच्या भोंगळ कारभाराचा पर्दाफाश केला.
याप्रसंगी शिवसेना उपनेते शुभांगी पाटील, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, महानगर प्रमुख धीरज पाटील, भरत मोरे, प्रशांत भदाने, ज्योती चौधरी, संदीप सूर्यवंशी, डॉ. अनिल पाटील सुनील पाटील, सुभाष मराठे, मुन्ना पठाण, आनंद जावडेकर, आण्णा फुलपगारे, पंकज भारस्कर,कपील लिंगायत, शिवाजी शिरसाळे, संदीप चौधरी, सुनील चौधरी, सागर निकम, विकास शिंगाडे,सागर साळवे ,दिनेश पाटील,अजय चौधरी,नितीन देशमुख,अनिल शिरसाट, संजय पाटील, दिनेश गुरव,अमोल ठाकूर, वैभव पाटील, हर्षल वाणी, शुभम रणधीर,अक्षय पाटील,विष्णू जावडेकर, आशुतोष कोळी, गोकुळ बडगुजर, तेजस सपकाळ आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *