धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन द्यावे : खासदार डॉ. शोभाताई बच्छाव

दिशा समितीच्या बैठकीत केंद्र पुरस्कृत योजनांचा घेतला आढावा

धुळे जिल्हा

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे यासाठी त्यांना प्रोत्साहन देत मार्गदर्शन करावे, असे निर्देश खासदार डॉ. शोभाताई बच्छाव यांनी जिल्हा विकास व सनियंत्रण समितीची (दिशा) बैठकीत आज दिले.

जिल्हा विकास व सनियंत्रण समितीची (दिशा) बैठक जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात आज झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी खासदार ॲड. गोवाल पाडवी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजिज शेख, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, उपवनसरंक्षक मोहन नाईकवाडे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र इंगळे, जिल्हा विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजन पाटील, ‘दिशा’ समितीचे सदस्य सुनील शिंदे, भाईदास नगराळे, हेमांगी सनेर आदी उपस्थित होते.

खासदार डॉ. बच्छाव म्हणाल्या की, नैसर्गिक शेतीमुळे उत्पादन खर्चात घट होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते. तसेच जमिनीची सुपीकता टिकून राहते. पर्यावरणपूरक शेती पद्धतीचा अवलंब केल्यास शाश्वत शेतीचा मार्ग खुला होईल, यासाठी कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र व संबंधित यंत्रणांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे. वन विभागात विकास कामे करताना वनविभागाची पूर्वपरवानगी घ्यावी. ई नाम ग्राम योजनेतंर्गत सर्व बाजार समितीचे व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने करावेत. महानगरपालिकेने अमृत 2 ची कामे पूर्ण करावीत. पाझरा नंदी स्वच्छ करण्यासाठी मोहीम राबवावी. जिल्ह्यातील उर्वरीत अंगणवाडीचे डिजिटलायझेशन करावे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची मंजूर कामे दर्जेदार करावीत. किसान कॉल सेंटर मार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. पाणलोट क्षेत्र योजनेत धुळे जिल्ह्याचा समावेशासाठी प्रस्ताव सादर करावा. जल जीवन मिशन योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी. अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देत त्यांनी उत्पादीत केलेल्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध करुन द्यावी.


खासदार ॲड. गोवाल पाडवी म्हणाले की, साक्री व शिरपूर तालुक्यातील जनजीवन मिशनचे कामे प्राधान्याने पुर्ण करावी. जुन्या प्रस्तावासाठी निधी मागणीचे प्रस्ताव सादर करावेत. शबरी आवास योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ द्यावा. आदिवासी विकास विभागाने केंद्रीय योजनेतून सुरु असलेल्या योजनांची माहिती द्यावी. रोजगार हमी योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरीची रक्कम वेळेत वितरीत करावी, शिरपूर येथील बसस्थानक दुरुस्तीसाठी प्रस्ताव सादर करावा. संजय गांधी निराधार योजनेची तालुकास्तरावर समिती स्थापन करण्याचे त्यांनी सांगितले.

*विविध योजना आणि विषयांवर सखोल चर्चा*

यावेळी प्रधानमंत्री फसल विमा योजना, राष्ट्रीय आरोग्य अभियान, सर्व शिक्षा अभियान, मध्यान्ह भोजन, एकात्मिक बाल विकास, प्रधानमंत्री मातृ वंदना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री कौशल्य विकास, डिजिटल इंडिया, पायाभूत सुविधांशी संबंधित दूरसंचार, रेल्वे, महामार्ग, प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण आदी विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत समितीच्या अशासकीय सदस्यांनीही विविध सूचना केल्या. यावेळी विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *