धुळे जिल्हा
धुळे येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या कवायत मैदानावर स्फोटक सदृश्य वस्तू आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. काल रात्री हा प्रकार समोर आला. मैदानावर असलेल्या किल्याच्या बुरुजा जवळ ती स्फ़ोटक सदृश्य वस्तू आढळली. याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
यासंदर्भात राज्य राखीव पोलीस दलचे (गट क्र.६) पोलीस निरीक्षक देविदास सुखदेव अहिरे यांनी धुळे तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे,की राज्य राखीव पोलीस दलाच्या (गट क्र.६) कवायत मैदानावरील किल्याच्या बुरुजा जवळ अज्ञात व्यक्तींने बेकायदेशीरपणे प्रवेश करून साधारणपणे १२ सेमी लांब, ८ से.मी रुंद आणि ४ से.मी उंचीचा, खाकी रंगाचा आणि त्याच्या मध्यभागी एक गोलाकार छिद्र असलेला एक चौकोनी ठोकळा ठेवला आहे. ठोकळ्याच्या एका बाजुला काळ्या रंगात इंग्रजीत स्लॅब डेमोलिशन टीएनटी उईथ इंटेग्रेलोये १९६७ के.ओ. एफ.लॉट नं-२२ अशी अक्षरे गिरविण्यात आली आहेत.
राखीव दलाच्या मैदानावर आढळलेली ही वस्तू स्फ़ोटक असू शकेल असा संशय व्यक्त करण्यात आला असून या घटनेची माहिती पोलीस अधीक्षकांसह धुळे तालुका पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.